बारामती(वार्ताहर): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालया समोर भारतीय युवा पँथर संघटनेने केलेल्या उपोषणामुळे या कामगारांना येणार्या काळात किमान वेतनानुसार पगार व मोफत उपचार मिळणार आहे.

कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे व कर्मचारी व कर्मचार्याच्या कुटुंबाला मोफत उपचार रुग्णालयात मिळावा. अशी मागणी कर्मचार्यांनी केली होती. सदरची मागणी भारतीय युवा पँथर संघटनेने रुग्णालयासमोर उपोषण करून प्रशासनाला जागे केले. यावेळी उपोषणात कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होते.
संघटना व कर्मचार्यांच्या मागणीनुसार किमान वेतन कायद्याने वेतन देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा रुग्णालय प्रशासन करणार आहे. तसेच कर्मचारी यांना मोफत उपचार देण्यात येईल असे लेखी पत्र रुग्णालयाचे आधिष्ठाता यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
सदर उपोषणाला कंत्राटी कर्मचारी व भारतीय युवा पँथर संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचारी यांनी भारतीय युवा पँथर संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार केला.