बारामतीः पीडीसीसी बँक रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवणे, शिवतिर्थ मतमोजणी जागा बदलण्याचे कारस्थान केले जात असेल तर हे सगळं लोकशाहीला मारक असल्याचे मत सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख रंजनकुमार तावरे यांनी व्यक्त केले.
निवडणूक प्राधिकरणाने मंजूर केलेल्या मतमोजणी जागा बदलण्याचा डाव राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवतिर्थ मंगल कार्यालय सुरक्षित आहे. सुरक्षा भिंत मजबुत आहे. पाणी, लाईट 24 तास आहे. स्ट्राँग रूम आहे एवढं सगळं असताना मतमोजणी ठिकाण बदलण्याची गरज काय झाली. दि.19 मे 2025 रोजी निवडणूक अधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पत्र दिले. शिवतिर्थ याठिकाणी मतमोजणीसाठी लागणाऱ्या पोलीस संख्याबळ द्या म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामतीचे उपविभागीय अधिकारी श्री.नावडकर, तहसिलदार श्री.शिंदे यांनी सदर कार्यालयाची पाहणी करून, मतमोजणी करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.
नव्याने आलेले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अचानक हा निर्णय कसा घेतला याबाबत शंका उपस्थित होत आहे. कारण सांगितले जात आहे की, शिवतिर्थ याठिकाणी मतमोजणी घेतल्यास 13 लाखाचा खर्च आणि 260 पोलीस कर्मचारी लागत आहेत आणि वखार महामंडळाच्या हॉलला 5 लाख आणि 110 कर्मचारी लागतात. कार्यालयासमोर बगॅस असल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटना होण्याची शक्यता नाकरता येत नाही. एकदा मंजूर झालेले मतमोजणी ठिकाणी बदलण्याचा घाट उपमुख्यमंत्र्यांनी लावला आहे.
शिवतिर्थ हे ठिकाणी अतिशय पवित्र ठिकाण आहे. अण्णा हजारे यांच्या हस्ते या कार्यालयाचे भूमिपूजन तर गगनगिरी महाराजांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. निकाल कोणाचाही लागेना तो स्वीकारला जाईल मात्र, तातडीने मतमोजणी जागा बदलण्याचा डाव रचला जात आहे.
मतमोजणी ठिकाण बदलण्याचे दुसरे कारण दिले जात आहे. दोन तीन दिवसापूर्वी यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री बसले होते. त्यांनी कार्यकारी संचालकाला बोलावून मतमोजणी ठिकाण रद्द करणेबाबत पत्र काढा असे सांगितले आणि त्याठिकाणी लग्नाची तारीख आहे असे सांगा.
शिवतिर्थ मंगल कार्यालय एखाद्या कार्यक्रमास घेण्यासाठी एक-एक महिना बुकींग असते. दि.20 जून 2025 रोजी बुकींग झालेले कार्यालयात लगेच रविवारी म्हणजे मतमोजणी दिवशी लग्न आहे. हा सर्व कुटील डाव सुरू आहे. बरं लग्न कोणाचे आहे रामचंद्र बाबुराव सस्ते हे कारखान्याचे सभासद आहे. त्यांच्या नातीचे वैष्णवी धनंजय सस्ते हीचे लग्न सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या मुलीचे लग्न कोरोनाच्या काळामध्ये 7 डिसेंबर 2021 मध्ये लग्न झाले त्या लग्नाला मी हजर आहे. मुलीचा चुलता सातवाच्या शोरूमचे कामाला आहे त्याच्यामार्फत बुकींग गेले अशा प्रकारे लबाडी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व कृत्याचा आम्ही निषेध करतो.