बारामती(प्रतिनिधी): सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने विजय मिळवल्यानंतर युवा नेते श्री. जय अजितदादा पवार यांनी सर्व विजयी उमेदवारांसह स्व. लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली.
यावेळी जय पवार यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील हा विजय स्व. अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला.

स्व. अजितदादा पवार यांचे सहकार क्षेत्रातील योगदान आणि सोमेश्वर कारखान्याशी असलेले त्यांचे नाते यांचे स्मरण करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
दादांनी रुजवलेला विश्वास, सभासदांनी दिलेला कौल; हा विजय स्व. अजितदादांच्या कार्याला समर्पित!
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ला भरघोस विजय मिळवून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी सर्व सभासद मतदारांचे मानले आभार; विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत (2026-2031) ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’वर विश्वास दाखवून भरघोस विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी सर्व सभासद मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले असून, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
आदरणीय स्व. अजितदादांनी तब्बल 34 वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी योगदान दिले. कारखान्याशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते, सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने आणि सहकार क्षेत्रात त्यांनी जपलेला वारसा यांचे स्मरण या विजयाच्या निमित्ताने होत आहे. दादांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत त्यांची स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

या निवडणुकीत सभासद शेतकरी बांधव-भगिनींनी दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत हीच आमची ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन सभासदांचे हित जपणे, शेतकऱ्यांची समृद्धी साधणे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची प्रगती अधिक गतिमान करणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
हा विजय केवळ आनंदाचा क्षण नसून, सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी आहे. सभासद शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे, हेच आमचे ध्येय राहील, अशी भावना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.