एक उमदं मित्रवत्‌‍ व्यक्तीमत्व : ॲड.भार्गव पाटसकर

सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे शांत, संयमी, सौम्य, प्रगल्भ, धीरोदात्त व मनमिळावू स्वभावाचे एक उमदं मित्रवत्‌‍ व्यक्तीमत्व म्हणजे ॲड.भार्गव सुधीर पाटसकर आहेत. 16 नोव्हेंबर त्यांचा वाढदिवसानिमित्त….

महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारकांची भूमी मानली जाते. अशा पावन भूमीत सातारा सारख्या गावात वार गुरूवार 16 नोव्हेंबर 1995 साली भार्गव सुधीर पाटसकर यांचा जन्म झाला. बालपण गोकुळवाडी, बारामती येथे गेले. वडिल ॲड.सुधीर पाटसकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. भार्गव यांना घरातून सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील बाळकडू मिळाले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाची दिवाळी व्हावी, सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश पसरावा या प्रमाणे पाटसकर कुटुंब समाजात काम करीत आले आहेत.

प्राथमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठानचे बाल विकास मंदिर बारामती याठिकाणी झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील फर्गुसन नवलमल फिरोदिया कॉलेजमध्ये वकील ही पदवी घेतली. सध्या निष्णात वकील म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पहिल्यापासून भार्गव यांची चौकस बुद्धी होती. चाणक्य नितीनुसार बुद्धी हेच माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे यानुसार त्यांनी शिक्षण घेत असताना शाळेची सहल बाहेरगावी जाणार असल्याने, भार्गवसह मित्रांनी एका मॉलमधून सहलीला जाण्याचे खाद्यपदार्थ खरेदी केले. या खाद्य पदार्थामध्ये एक शीतपेय असे होते की, ज्याची वापर करण्याची शेवटची तारीख संपुष्टात आली होती. या शीतपेयामुळे कित्येक मुले सहलीनंतर आजारी सुद्धा पडली होती. ही गोष्ट भार्गवने मित्रांच्या लक्षात आणून दिली. सर्व मित्रांनी मिळून ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते यांच्या निर्देशनास आणून दिली. त्या मॉलची तक्रार दाखल झालेवर संबंधित मॉलवर कारवाई झाली होती. या कारवाईमुळे मॉल मालकाने प्रत्येक वस्तुची अंतिम तारीख तपासणीसाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक केली हीच खूप मोठी कारवाई व आवाज उठविला म्हणून सत्याचा विजय म्हणता येईल.

कायद्याचा अभ्यास, न्यायाची जिद्द आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ठेवत त्यांनी बारामती येथील न्यायालयात कामकाज सुरू केले. भविष्याचा वेध आणि नविन ध्येय ठरविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे. कठीण प्रसंगी न घाबरता धाडसी निर्णय घेत त्यातून मार्ग काढण्यामध्ये भार्गव यांचा हातकंडा आहे.

आपल्यापेक्षा कनिष्ठ असो किंवा ज्येष्ठ त्याचे म्हणणे ऐकून घेणे हा त्यांचा सर्वांत उत्कृष्ठ गुण आहे. हा गुण वयाने नाही तर चांगल्या स्वभावाने येतो. कुटुंबातून त्यांच्यावर उत्तम संस्कार झालेले आहेत. समाजात काम करीत असताना, त्यांच्या कृतीतून त्या संस्काराला उजाळा मिळत असतो. कमी वयात त्यांनी वकीली क्षेत्रात नैपुण्य मिळविले आहे याचा आदर्श नव्याने वकील झालेल्यांनी घेतला पाहिजे. पक्षकारांशी कसा संवाद साधायचा, त्यांना कसा धीर द्यायचा, त्यास कायद्याची भाषेत न बोलता त्यास कळेल त्या भाषेत समजावणे, हाती घेतलेले प्रकरण त्यातील खाचखळगे, कायदेशीर बाजू आणि संभाव्य धोके स्पष्टपणे पक्षकाराला सांगत आले आहे. तो पक्षकार भावनिक झालेला असतो मात्र, त्याच्या भावनांचा अंत न पाहता त्यास न्याय कसा मिळेल याकडे ते जातीने लक्ष देत आलेले आहेत. क्लिष्ट गुन्ह्यातून कित्येकांची सूटका सुद्धा त्यांनी केली आहे.

बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आणि त्यांच्या नियंत्रणाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाचे नियमानुसार नगरपरिषदेस या कुत्र्यांचा बंदोबस्त करणेसाठी पत्रव्यवहार केला. त्यामध्ये शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस स्थानके, रेल्वे स्टेशन अशा सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण, विशेष निवारा केंद्र व आक्रमक कुत्र्यांबाबत कोणते उपाय करावे याबाबत विचार करावयास लावणारा पत्रव्यवहार केला. सदरचा पत्रव्यवहार करूनही काही कुत्र्यांच्या उपद्रवामुळे काही दुर्देवी घटना घडल्या होत्या. त्यावर आंदोलनाचा पवित्रा सुद्धा घेतला होता. या पत्रव्यवहाराची दखल घेत नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांवर योग्य ते उपाय योजना केले.

बारामती शहरात सप्तपर्णी झाडांच्या फुलांच्या उग्र वासाने बारामतीकरांना होणाऱ्या त्रासाबाबत नगरपरिषदेत लेखी स्वरूपात कळवून पर्यावरणावर असणारे प्रेम सुद्धा भार्गव पाटसकर यांच्यातून दिसून येते. या लेखी स्वरूपात दिलेल्या अर्जावर वृक्षतोडीला सुरूवात सुद्धा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दुर्गंधी सुटल्याच्या तक्रारीनंतर भरवस्तीत असणारा बायोगॅस प्रकल्प बंद करून, तो स्थलांतरीत करण्यात आला. बारामती नगरपरिषदेस कित्येक दिवस रिक्त जागेवर मुख्याधिकारी मिळत नसल्याने तसा पत्रव्यवहार करून आंदोलन करण्यात आले त्यानंतर बारामती नगरपरिषदेस मुख्याधिकारी मिळाले. कोरोना काळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना तात्काळ लस द्या ची मागणी भार्गव पाटसकर यांनी केली होती. महाराष्ट्र पोलीस संकेतस्थळावर संवेदनशील गुन्हे वगळता इतर सर्व एफआयआर टाकण्याचा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना त्याचे पालन होत नव्हते याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून सदरची एफआयआरची प्रत प्राप्त होऊ लागली. गीतकार जावेद अख्तर यांच्या वक्तव्यांवर दिलेली तक्रार असो किंवा कर्ज वसुली करण्यासाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स्‌‍ कंपनीवर गुन्हा दाखल करणे असो याबाबत सतत आवाज उठविला आहे.

तरूण व्यसनापासून दूर राहावा, त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा तो एक संघ राहावा म्हणून त्यांनी गेली दहा वर्षापूर्वी एकलव्य चषक दहिहंडी उत्सव सुरू केला. त्यास बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आले आहेत. भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात. चुकीच्या प्रकाराला कधीही पाठीशी न घालता त्यास बाह्या वर करून किंवा डोळे मोठे करून उत्तर न देता संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करीत असतात. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. त्या अन्याय सहन करणाऱ्या गुन्हेगारास बोलतं करण्याचे काम ते व त्यांचे वडील ॲड.सुधीर पाटसकर करीत आलेले आहेत व करीत राहतील यात शंका नाही.

पुनश्चः ॲड.भार्गव सुधीर पाटसकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पुढील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावेत. सुख, समृद्धी व भरभराटीबरोबर आरोग्यदायी जीवन लाभो हीच ईश्वराजवळ प्रार्थना.

तैनुर शफिर शेख, संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!