महान मदतनीस, संतांचे संत आणि दस्तगीर अशा पदव्यांनी आदराने ओळखले जाणारे, हजरत अब्दुल कादिर जिलानी होते – हजरत मौलाना अतिकअहमद साहेब

बारामती(प्रतिनिधी): महान मदतनीस म्हणजे गौसे-ए-आझम, संतांचे संत म्हणजे पीराने पीर आणि दस्तगीर अशा पदव्यांनी आदराने ओळखले जाणारे, हजरत अब्दुल कादिर जिलानी (गौस पाक) होते असे प्रतिपादन बस्ती उत्तर प्रदेशचे मौलाना अतिक अहमद रिजवी यांनी केले.

हजरत चाँदशाहवली दर्गाह मशिद मैदानात शहंशाह-ए-बगदाद सीरत-ए-गौसे-ए-आझम यांची अध्यात्मिक व धार्मिक वातावरणात परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मौलाना अतिक अहमद रिजवी बोलत होते. याप्रसंगी दर्गाह मशिदीचे मौलाना अमिर रजा कादरी, वेळापुरचे मौलाना अमीन, हाफिज मुख्तार साहेब इ. धर्मगुरू व मुस्लीम बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मौलाना अतिक अहमद रिजवी म्हणाले की, गौसे-ए-आझम यांच्या प्रवचनांना हजारो लोकांची गर्दी होत असे. सोप्या आणि प्रभावी उपदेशांमुळे हजारो अमानवी कृत्ये करणाऱ्या लोकांनी पश्चात्ताप (तौबा) केला आणि ते सन्मार्गाला लागले. ते पुढे बोलताना त्यांच्या बालपणीचा एक प्रसंग सांगताना मौलाना म्हणाले की, जेव्हा त्यांनी दरोडेखोरांना आपल्याकडे असलेले सोन्याचे नाणे स्वतःहून दाखवले. त्यांच्या या सत्याने प्रभावित होऊन दरोडेखोरांनी चोऱ्या करणे सोडून दिले होते. त्यांनी आयुष्यभर लोकांना नेहमी सत्य बोलण्याचा आणि गरिबांची मदत करण्याचा संदेश दिला.

हजरत गौस पाक यांचा जन्म सन 1077 (हिजरी सन 470) मध्ये इराणमधील जिलान प्रांतात झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ईश्वराची भक्ती आणि मानवाची सेवा करण्यात घालवले. सन 1166 (11 रब्बीऊलउल-आखिर 561 हिजरी) मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे बगदाद (इराक) येथे निधन झाले. त्यांची दर्गा आजही बगदाद येथे आहे, जिथे दरवर्षी जगभरातून लाखो श्रद्धाळू दर्शनासाठी जातात. दरवर्षी इस्लामिक कॅलेंडरनुसार ग्यारवी शरीफ म्हणून त्यांचा उरूस किंवा उत्सव साजरा केला जातो असेही ते म्हणाले. मौलाना अतिक अहमद यांनी गौस-ए-पाक यांच्या शिकवणीवर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांचे विचार ऐकून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.

कोण आहेत हजरत अब्दुल कादिर जिलानी (गौस पाक)
त्यांचे आई आणि वडील दोन्हींकडून प्रेषित मोहम्मद (स.अ.व.) यांच्या वंशातील (अहले बैत) होते. त्यांचे वडील हजरत अबू सालेह मुसा जंगी दोस्त हे इमाम हसन यांचे वंशज होते, तर त्यांची आई सैयदा उमुल खैर फातिमा या इमाम हुसेन यांच्या वंशातील होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिलानमध्ये पूर्ण केल्यानंतर, वयाच्या 18 व्या वर्षी ते उच्च शिक्षणासाठी इराकची राजधानी बगदाद येथे गेले. त्या काळी बगदाद हे इस्लामिक जगतातील ज्ञानाचे सर्वात मोठे केंद्र होते. तिथे त्यांनी कुराण, हदीस (प्रेषितांची वचने), इस्लामिक कायदा आणि अध्यात्माचे (सुफीवाद) सखोल ज्ञान आत्मसात केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कित्येक वर्षे जंगलात आणि निर्जन ठिकाणी कठीण तपश्चर्या व आत्मशुद्धी केली. हजरत अब्दुल कादिर जिलानी हे सुफी संप्रदायातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या कादिरिया सुफी सिलसिल्याचे संस्थापक आहेत. या पंथाचा प्रसार संपूर्ण आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या काही भागांत झाला. भारतातही या पंथाचे कोट्यवधी अनुयायी (मुरीद) आहेत.

या परिषदेच्या दरम्यान मौलाना अमीर रजा कादरी यांनी गौस पाक यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ सुमधुर नात-ए-पाक सादर करत संपूर्ण जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. मौलाना अमीन वेळापूरकर यांनी सुंदर कलाम वाचले तर हाफीज मुख्तार साहब यांच्यासह असंख्य मौलाना व उलेमा-ए-किराम यांनी वेगवेगळ्या धार्मिक विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचन केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांनी अत्यंत गोड आवाजात नात-ए-पाक सादर करून सर्वांची मने जिंकली.

सदर कार्यक्रम स्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभारी परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे यांनी स्वतः कार्यक्रम स्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कमिटीच्या वतीने पोलीस अधिकारी आणि प्रशासनाचे जाहीर आभार मानण्यात आले.

महिला भाविकांसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी बसण्याची आणि पडद्याची अत्यंत स्वतंत्र व उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. सर्व धार्मिक विधी आणि प्रवचनांची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी गौसिया कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या भोजनाचा अस्वाद घेतला.

सदरचा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती युथचे संपादक अजहर शेख, आफ्रोज मुजावर, शमशुद्दीन शेख, रियाज खान, अय्याज शेख, रिजवान मुजावर, हैदर सय्यद, ग्रामसेवक शाहनूर शेख, रजा शेख, वसीम सय्यद, आमीन पठाण, शफातुल्ला मन्सूरी, निजाम पेंटर, फैय्याज रज्जाकभाई, शेख सुब्हान कुरेशी, वसीम कुरेशी, शरफुद्दीन कुरेशी, अबुभाई, इन्नुस मुजावर, हयातुल्ला मन्सूरी, हसन शेख, रमजान शेख, फिरोज सय्यद, अरबाज पठाण, सोनू मुजावर, मन्सुर शेख, इम्रान पठाण, सलमान शेख, मुस्तफा शेख, अरशान शेख, अली शेख, हैदर शेख आणि गौसपाक कमिटीच्या सर्व सहकाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन परिश्रम घेतले. सदरच्या परिषदेला तब्बल दोन ते अडीच हजार भाविकांनी उपस्थित राहुन लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!