बारामती(प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) करते काय? वेश्याव्यवसायातील रॅकेट आणि मानवी व्यापार बारामती शहर व तालुक्यासह इतरत्र सर्रासपणे सुरू असताना विशेष वृत्तपत्रांच्या बातम्यांचा वर्षाव होऊनही पोलीसांची बघ्याची भूमिका असेल तर मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी कोणी असा ग्रहण प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखेला अनन्य साधारण महत्व आहे. गुन्हेगारांचा शोध घेणे, अत्यंत संवेदनशील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पुणे जिल्ह्यातील स्थानिक पोलीस स्टेशनला सहकार्य व तपास करतात. तपास व सहकार्याबरोबर या गुन्ह्यांचे व गुन्हेगारांचे रेकार्ड ठेवण्याचे काम केले जाते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत एकूण पाच उपशाखा कार्य करतात. यामध्ये जिल्हा गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (डीसीआरबी), दरोडा विरोधी संघ (एडीएस), मोडस ऑपरेंडी ब्यूरो (एमओबी), फिंगर प्रिंट शाखा व मानव तस्करी विरोधी शाखा या उपशाखा आहेत.
भिगवण व बारामती परिसरात सर्रासपणे लॉजवर व्यवसाय सुरू आहे. खरं तर या स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी, जुगार, बेकायदेशीर शस्त्रसाठा आणि मानवी तस्करी इ. सारख्या गंभीर गुन्ह्यांवर थेट छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश असताना, पुणे जिल्ह्यात 13 ते 14 तालुके असताना फक्त बारामती शहर व तालुक्याचा आढावा घेतला असता, वरील गुन्ह्यांवर सक्षमपणे कारवाई झाली असती तर या गुन्ह्यांनी व गुन्हे करणाऱ्यांनी डोकं वर काढले नसते हे ही तेवढेच सत्य आहे.
स्थानिक गुन्हे शाखा हे विशेष पथकास प्रामुख्याने जिल्ह्यातील गंभीर, क्लिष्ट आणि अतिसंवेदनशील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कार्य करते. आज हे पथक सक्षमपणे काम करीत नसतील आणि पुणे जिल्ह्यातील 13 ते 14 तालुक्यातील पोलीस स्टेशनला सहकार्य किंवा समांतर तपास करून गुन्हे व गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करीत नसतील तर सदरची शाखा बरखास्त करण्यात यावी.
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा गुन्हे व गुन्हेगारांचा आढावा घेतला असता, तेच गुन्हे, तेच आरोपी आणि कारवाई करणारे तेच पोलीस त्यामुळे सदरची स्थानिक गुन्हे शाखा बरखास्त तरी करावी किंवा त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. भाकरी फिरली पाहिजे ती करपता कामा नये त्याप्रमाणे या शाखेत काम करणारे हुशार आणि अनुभवी अधिकारी व कर्मचारी यांची प्रत्येक दोन वर्षाला बदली होणे गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विशेषतः बारामती शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद न झाल्यास लवकरच पुणे ग्रामीण पोलीसांच्या विरोधात वृत्तपत्राच्या माध्यमातून पेन वॉर सुरू करून अवैध धंद्यांचे लोकशनसह बुरखा फाड करण्याचा प्रयत्न करणार आहे.