इंदापूर (प्रतिनिधी): रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांची गुन्हेगारी मोडीत काढणेसाठी कारवाईचा बडगा उगारुन इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशन हददीमध्ये वास्तव्यास असलेला धोकादायक इसम नामे अंबादास तायप्पा पवार (वय 38, रा.चिखली, ता.इंदापुर जि.पुणे) याचे विरुध्द सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या सराईत आणि विघातक प्रवृत्तीच्या लोकांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धता एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
पवार याचे विरुध्द यापुर्वी सन 2011, सन 2014, सन 2016, सन 2024, सन 2026 मध्ये बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करणे, दरोडा घालण्याची पुर्व तयारी करुन दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे, अवैधपणे बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, संगणमत करुन जबरी चोरी करणे, संगणमत करुन मृत्यु किंवा जबर दुखापत याची भिती घालुन खंडणी मागणे, दरोडा घालणे, जमाव बंदीचा आदेश असताना अवैधपणे बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, संघटीत गुन्हेगारी करुन्? कट रचुन दरोडा घालणे, संगणमत करुन घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत करुन खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करुन इच्छापुर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहवणे व 20 हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक एक लाख रुपयापेक्षा कमी असेल याची हानी अथवा नुकसान करणे असे भारतीय दंड विधान 1860 चे प्रकरण 16 व 17, नवीन भारतीय न्याय संहिता 2023 चे प्रकरण 06 व 17 तसेच भारतीय हत्यार कायदा प्रकरण 5 मधील 10 गुन्हे दाखल होते.
पवार हा सराईत धोकादायक असल्याने त्याचेविरुध्द एम.पी.डि.ए कायदयांतर्गत कार्यवाही होणेकामी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्हयामध्ये मागील 5 वर्षाचे कालावधीत दाखल गुन्हयामधील जामीनावर मुक्त झालेले आरोपी, तसेच त्यांचे विरुध्द पुन्हा दाखल झालेले गंभीर गुन्हे याचे रेकॉर्ड अद्ययावत करणेबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले होते. त्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली.