अजितदादांनी स्वतः तयार केलेली टेंडर रद्द का होत होती: व्हीएसआरची 168 कोटींची बिले मंजूर

बारामतीः सरकारकडून बुक केल्या जाणाऱ्या विमानांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक वेळा व्हीएसआर याच कंपनीचे विमान आरक्षित केले जात असे. यामागे सरकारमधील काही हितचिंतकांचा हात असल्याचा आरोप आ.रोहित पवार यांनी केला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, अजितदादांनी स्वतः तयार केलेली टेंडर देखील याच कारणामुळे रद्द करण्यात येत होती. व्हीएसआरची 168 कोटी रुपयांची बिले मंजूर होत होती.

दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने बोट दाखवत आरोप केले आहेत. 16 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आता त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‌‘एक्स‌’वर एक सूचक पोस्ट करत सरकारला थेट इशारा दिला आहे.

अजितदादा पवार यांचा हा विमान अपघात होता की घातपात, याचा उलगडा व गुन्हा गेल्या साडेनऊ महिन्यांपासून का होऊ शकला नाही? असा सवाल ही पवार उपस्थित करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते एका गूढ ‌‘मफलरमॅन‌’चा उल्लेख करत होते. अखेर 16 नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो दाखवत तेच ‌‘मफलरमॅन‌’ असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “व्हीएसआर कंपनीच्या बचावार्थ पूर्ण ताकदीने उतरलेला ‌‘आयटी सेल‌’ पाहून ‌‘ती खात्री‌’ अधिक पक्की झाली आहे. अजितदादांची पसंती कधीच व्हीएसआर कंपनी नव्हती, तर सरकारमधील या कंपनीच्या हितचिंतकांची ती पसंती होती.”

व्हीएसआर कंपनीचे खरे हितचिंतक कोण आहेत आणि इतके प्रेम का दाखवले जात आहे. असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई न झाल्यास, आपण लवकरच ‌‘पुढील प्रेझेंटेशन‌’ सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!