उत्तम केलं पुरूषोत्तम….

एखादे पक्ष, संस्था किंवा सहकार क्षेत्रात काम करीत असताना, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावे लागते. एकमेकांचे हेवे दावे काढीत बसलो तर ती संस्था, पक्ष चालणार नाही. लवकरच त्या संस्थेचा गाशा गुंडाळावा लागेल एवढं खरं आहे. गेली 13 वर्ष सोमेश्वर साखर कारखान्याची चेअरमन पदाची धुरा सांभाळून सुद्धा ऐन कारखान्याच्या निवडणूकीत बंडखोरी करून स्वतंत्र पॅनल टाकून उत्तम केलं राव पुरूषोत्तम असे सभासद वर्गात एकच चर्चा सुरू आहे.

लोकनेते अजितदादांनी पुरूषोत्तमवर जो विश्वास दिला. कारखान्याची सर्व सुत्रे हाती दिली त्याची परतफेड चांगली केली. पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजिदादांचे विमान अपघाती निधन होऊन वर्षही झाले नाही तोपर्यंत निष्ठावंत, विश्वासू अशा पुरूषोत्तमने बंडखोरी करून कोणाच्या पाठीवर खंजीर खुपसला हे सभासद वर्गाने जाणले पाहिजे.

लोकनेते अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा विचार करून कारखान्याच्या वृद्धीसाठी मनोमन प्रयत्न केला. कारखान्याच्या कारभारात जातीने लक्ष घातले. प्रत्येक बारीक-बारीक गोष्टीवर लक्ष देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले. कारखाना परिसर, तेथील रस्ते, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक पाया भक्कम केला. राज्यातून निधी आणला आणि सोमेश्वर कारखाना परिसराचा कायापालट केला हे सर्वांना ज्ञात आहे.

ऐन निवडणूकीच्या प्रसंगी स्वतंत्र पॅनल करून काय साध्य करणार आहे. काही मंडळी पॅनेलमध्ये नको म्हणून पुरूषोत्तम नाराज झाले. सहकार क्षेत्रात 13 वर्ष काढून सुद्धा विना सहकार, नही उद्धार याचा अर्थच कळालेला दिसत नाही. हा नको..तो नको असे म्हणून सहकार क्षेत्र चालेला का, सर्वांची मूठ बांधून पुढे जावे लागते. आज पुरूषोत्तम म्हणतात, भविष्यात या काही मंडळींमुळे कारखान्यात अडचण निर्माण होऊ शकते. आज दादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींनी सर्व कारभार हाती घेतला आहे. काही अडचण निर्माण झाली तर त्यास खंबीर साथ, नेतृत्व व मार्गदर्शन सुनेत्रावहिनी यांचे असणार आहे. कितीही मोठी अडचण आली तरी त्या खंबीर आहेत. उभा राहणाऱ्या प्रश्नाला कसे खाली बसवायचे हे त्यांना चांगले ज्ञात आहे. अडचण दूर कशी करायची व नाक दाबल्यानंतर तोंड कसे उघडते हे त्यांना नविन नाही.

13 वर्ष चेअरमन केलेले जर काळ वेळ न पाहता असा दगाफटका देत असतील, तर येणाऱ्या पुढील काळात पक्षाच्या नेत्यांना ताक सुद्धा फुकून प्यावे लागणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे सर्वसामान्य तळागळातील कार्यकर्ता आजही खंबीरपणे उभा आहे. मात्र, पक्षाच्या जीवावर स्वतःची तुंबडी भरलेली लोकं असा दगाफटका करीत असतील तर येणाऱ्या काळात अशा लोकांवर पक्षाने व पक्षाच्या नेते मंडळींनी विश्वास ठेवावा का नाही याचा विचार करावा. सोमेश्वरचा चेअरमन सर्वसामान्य व तळागळातील असावा अशीही आशा सभासदांमध्ये व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!