ज्ञान, अनुभव, संवेदनशीलता आणि नेतृत्वयांचा अद्वितीय संगम म्हणजे किरणदादा गुजर: ‘बालगंधर्व विशेष सन्मान’ पुरस्काराने सन्मानीत


बारामती(प्रतिनिधी):अनेक टप्प्यांवर विविध अनुभवांनी घडलेले व ज्ञान, अनुभव, संवेदनशीलता आणि नेतृत्व यांचा अद्वितीय संगम असणारे नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण(दादा) गुजर यांना महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत संस्था म्हणून गणली जाणारी बालगंधर्व रंगमंदीर या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ना.मुरलीधर मोहळ, अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

किरणदादा गुजर यांचे वडील स्व बबनराव गुजर यांची 53 व्या पुण्यतिथी दिवशी हा पुरस्कार मिळाल्याने दुग्धशर्करा योग आला आहे.

मराठी प्रेक्षकांच्या प्रिय ‌‘बालगंधर्व‌’ (नाट्यप्रेमी कलाकार) यांच्या वार्धापन दिनी विविध कला व समाजकार्य क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करीत आलेली आहे.

किरणदादा हे नाट्य, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात गेली चार दशके (40 वर्षे) सातत्याने कार्य करीत आलेले आहेत. दादांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत समृद्ध, परिपक्व आणि प्रेरणादायी आहे.

या कार्यक्रमास राज्यभरातील विविध नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ कलाकार व कलावंत उपस्थित होते.

चार दशके अखंड नाट्य सेवा

किरण गुजर यांनी 1979 पासून नाट्य क्षेत्रात आपले योगदान देण्यास सुरुवात केली. त्यांच्या नटराज नाट्य कला मंडळाने आतापर्यंत 49 नाटकांची निर्मिती केली असून, 1981 पासून सलगपणे पारितोषिके मिळवत त्यांनी आपल्या नाट्य संस्थेची वेगळी ओळख निर्माण केली.

यशस्वी नाट्य संमेलने व उपाध्यक्षपद गुजर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे. 1995 आणि 2012 या वर्षांमध्ये बारामती येथे दोन भव्य दिव्य नाट्य संमेलनांचे यशस्वी आयोजनही त्यांनी केले होते.

पुरस्कारांची शिदोरी त्यांच्या कार्याची दखल घेत आजवर नाट्य गौरव, कला गौरव आणि जीवन गौरव असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. याशिवाय, राज्यभरातील कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

बारामतीत रंगणारी संस्कृतीची ज्योत

बारामती येथे गेली 20 वर्षे विविध उपक्रमांतून त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. यामध्ये स्वस्त नाटक योजना, लावणी महोत्सव, ज्येष्ठ कलावंत, गौरव सोहळे, नाट्य व नृत्य प्रशिक्षण शिबिरे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा बारामती गणेश फेस्टिवल यांचा समावेश होतो.

नटराज कलादालन नवसंस्कृतीचं केंद्र

गुजर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ‌‘नटराज कलादालन‌’ या वास्तूत दर रविवारी ‌‘कलाकार कट्टा‌’ हा उपक्रम राबवण्यात येतो. येथे चित्रप्रदर्शने, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम होत असून कलाकारांसाठी विनामूल्य विश्रामगृहाची सुविधा देखील उपलब्ध आहे.

या पुरस्काराच्या निमित्ताने किरण गुजर यांच्या कार्याला एक मोठा सन्मान प्राप्त झाला असून, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी हे निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!