इंदापूरकरांची हर्षवर्धन पाटलांना काळजी : मध्यम दुष्काळग्रस्तावरून गंभीर दुष्काळग्रस्त करण्याची मुख्यमंत्र्यांना मागणी

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): ज्याप्रमाणे देशाच्या पंतप्रधानांना देशाचे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याचे तसेच तालुक्याच्या माजी आमदारांना स्वत:च्या तालुक्याबाबत काळजी असते ते इंदापूर तालुक्याचे माजी आमदार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुका गंभीर दुष्काळग्रस्त जाहीर करणेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देवून मध्यम दुष्काळग्रस्त जाहीर केले खरे मात्र, गंभीर दुष्काळग्रस्त म्हणून नोंद होणेबाबत केलेल्या मागणीवरून इंदापूरकरांचे काळजीवाहू माजी आमदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

इंदापूर तालुक्याचा समावेश शासनाने मध्यम दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये नुकताच केलेला आहे. मात्र इंदापूर तालुका आवर्षणप्रवण क्षेत्रात येत असून सोलापूर जिल्ह्यच्या सीमेलगत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये अत्यल्प असा पाऊस झालेला आहे. त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्याचा समावेश मध्यम दुष्काळग्रस्त ऐवजी गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बुधवारी (दि.1) केली आहे.

राज्य शासनाने सन 2023 खरीप हंगाम परिस्थिच्या आधारे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यातील एकूण 43 तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये 24 तालुक्यांचा गंभीर दुष्काळग्रस्त तर 16 तालुक्यांचा मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त असा दोन विभागांमध्ये समावेश केलेला आहे. शासनाने सदरच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनेक सवलती जाहीर केल्या असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाचा हा निर्णय शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने स्तुत्य व चांगला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

मात्र इंदापूर तालुक्याचा सामावेश मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे. राज्यातील गंभीर दुष्काळग्रस्त असलेल्या 24 तालुक्यांमध्ये जशी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे, तशीच गंभीर दुष्काळी परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये असून, दुष्काळाच्या झळा इंदापूर तालुक्यातील नागरिकांना व शेतकर्‍यांना बसलेल्या आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये पावसाळ्यातील जुन ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे आतापासूनच पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असल्याने इंदापूर तालुक्याचा समावेश हा गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यात करणेबाबत सहकार्य करावे, त्यामुळे गंभीर दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू होणार्‍या सवलती इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळू शकतील, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!