बारामती(वार्ताहर): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय बारामती द्वारा आयोजित शालेय क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज बारामती या विद्यालयाने विविध खेळात उत्तुंग यश संपादन केले.
14 वर्षे वयोगटात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटात प्रथम क्रमांक मिळविणारे संगम देवानंद झेंडे (41 कि.), वीर विशाल घोडे (52 कि.), प्रतीक संदीप धायगुडे (57 कि.), राजवर्धन दत्तात्रय ठोंबरे (68 कि.)या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत संगम देवानंद झेंडे, प्रतीक संदीप धायगुडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात 25 किलो खालील वजन गटात अभिषेक आनंदराव भिसे याने प्रथम क्रमांक मिळविला पुढे अहमदनगर येथे झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत अभिषेकने प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. वंश विवेक गायकवाड (50 कि.गटात तृतीय), अथर्व नंदकुमार बाबर (17 वर्षे वयोगटात द्वितीय) तर विनोद विवेक गायकवाड (80 कि.गटात द्वितीय) क्रमांक मिळविला.
शारदानगर क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात रिले स्पर्धेत मानस संजय काडिले, कार्तिक बाळासाहेब लव्हे, पवन ज्ञानेश्वर सुपेकर, हर्षल जालिंदर गावडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. धावण्याच्या स्पर्धेत कु. सिद्धी रणजीत हगवणे (17 वर्षे वयोगटात 400 मी. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक) तिची जिल्हास्तरावर निवड झाली. पुणे बालेवाडी जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेतही तिने प्रथम क्रमांक मिळविला व तिची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तालुकास्तरीय थाळीफेक स्पर्धेत ऋतिक लक्ष्मण गवंड (19 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक) मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. शालेय क्रीडा स्पर्धेत या विद्यालयाने खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ या सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन उत्तुंग कामगिरी केली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक सुजित जाधव व इतर क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सदाशिव सातव, रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बी.एन.पवार विद्यालयाचे प्राचार्य गणपतराव तावरे, पर्यवेक्षक बाळकृष्ण सुतार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.