बारामती(वार्ताहर): मोठ्या इमारती बांधून, दगडाचे देखावे, फुटपाथ सुशोभिकरण करून विकासाचा दिखावा करण्यापेक्षा कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे काम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले पाहिजे असे आवाहन भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील कर्मचार्यांशी साधलेल्या संवादाप्रसंगी अहिवळे बोलत होते.
किमान वेतनाबरोबर त्यांच्या कुटुंबाला मोफत उपचार रुग्णालयात मिळावा. या मागणीसाठी भारतीय युवा पँथर संघटना 2 नोव्हेंबर पासून रुग्णालयासमोर उपोषण करणार आहे.
सतत वाढती महागाई, दैनंदिन खर्च पाहता फक्त सहा हजार रुपयांमध्ये प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला. कोविड सारख्या परिस्थिती कित्येकांचे जीव वाचविण्याचे काम या कामगारांनी केले त्या लोकांनी सुद्धा या कर्मचार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
येणार्या काळात किमान वेतन दिले नाही तर रुग्णालयात काम करण्यास कर्मचारी मिळणार नाहीत. शासनाने वर्ग-3 कर्मचारी यांना 10 हजार रुपये वेतन दिले. प्रत्यक्षात मात्र 7 हजार रुपये मिळतात. वर्ग-4 कर्मचार्यांना 8 हजार त्यांना मात्र 6 हजार रूपयांवर समाधान मानावे लागत आहे. मोठ्या आशेवर रुग्णालय सुरू झाल्यापासून कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचार्यांना न्याय मिळेपर्यंत भारतीय युवा पँथर संघटना उपोषण करणार असल्याचे अहिवळे यांनी सांगितले.