कोणत्याही पक्षाचा, संस्थेचा किंवा सार्वजनिक मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे त्याचा आत्मा असतो. विविध पक्ष, संस्था व मंडळे आपल्या आसपास कार्यरत असतात. जो तो माझा पक्ष, संस्था व मंडळ किती श्रेष्ठ आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. यामध्ये काम करणारे कार्यकर्ते आपलं श्रेष्ठत्व दाखविण्याच्या नादात इतर मंडळ, पक्ष व संस्थेतील लोकांवर ताशेरे ओढताना दिसतात. या ओढलेल्या ताशेरेचे रूपांतर बाचाबाचीत होते. मग घालून पाडून बोलण्यात व अपशब्द वापरण्यात होते. कालांतराने हेच कार्यकर्ते आपआपसात भिडतात, एकमेकांची डोकी फोडतात. प्रकरण पोलीस स्टेशन, न्यायालयात जाते तिथं मात्र एकमेकांची डोकी फोडण्यास लावणारा येत नाही हे आतापर्यंतचे चित्र आहे.
राजकारणाचा विषय घ्यावा तर या राजकारणात तर सगळं काही आश्र्चर्यचकितच घटना घडत आहे व ते उघड्या डोळ्याने मतदार पाहत आहेत. ज्या पक्षाला सर्व जाती-धर्माला घेऊन जाणारा पक्ष पाहुन मतदारांनी भरभरून मते दिली. त्यांच्यावर विश्र्वास ठेवला त्यांनीच मतदारांच्या मताला फाट्याने मारले आणि दसर्याला सिमाउल्लंघन करतात त्याप्रमाणे राजकीय नेते सहज पक्षाचे नियम व अटींचे उल्लंघन करून विरोधातील पक्षाला पाठिंबा देतात आणि त्यांच्याशी सोयरीक करून सत्तेत बसतात.
या पक्षातील कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून आपल्या नेत्यासाठी काम केले. मतदारांच्या दाराचे उंबरे झिजविले, मतदारांना ओरडू-ओरडून माझा नेता किती पावरफुल आहे हे सांगितले आणि त्याच नेत्याने काय केले. त्यामुळे कोणताही पक्ष असो, संस्था असो किंवा मंडळ असो यामध्ये काम करणार्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी समन्वय व संवाद साधुन चांगले संबंध प्रस्थापित करावे. एकमेकांमध्ये द्वेष, मत्सर न बाळगता आम्ही सर्व एकच आहोत असे सार्वजनिक जीवनात वावरत रहावे. कारण नेतेमंडळी कधीही केव्हाही तळ्यात मळ्यात करतील कार्यकर्ते मात्र ठाम असतात ते फक्त आणि फक्त पक्ष, संस्था किंवा मंडळासाठी तहयात कामच करीत राहतात हे जाणले पाहिजे.
राजकीय मंडळी दसरा, दिवाळी इ. सारख्या सण, उत्साहात मांडीला मांडी लावून एकमेकांचे गालगुच्चे खेचत कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. म्हणे पक्षात फूट पडली ती फूट नसते दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे असे असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही गटाची पालखी उचलताना चार वेळा विचार करण्याची गरज आहे. एक गट जरी पावरफुल होत चाललेला असला तरी दुसर्या गटाचा नेता मात्र हे सर्व पाहुनही मुग गिळून गप्प का? या प्रश्र्नाचा विचार करण्याची गरज आहे. पावरफुल गट वाट्टेल ते बोलत आहे, कृती करीत आहे तरी सुद्धा दुसरा गट शांत का? की तो पावरफुल गटापेक्षाही चार पटीने पावरफुल असताना असे का होत आहे याचा ही विचार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.
राजकीय पक्षात काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता कधी आर्थिक बाबीने मोठा झालेला दिसला आहे का? त्या कार्यकर्त्याला कोणते तरी सेलचे अध्यक्ष केला की तो कार्यकर्ता –नाला पाय लावीत पळताना दिसतो. पक्षाची खरी मलई मात्र, पक्षाचा नेता, त्याचे पै-पाहुणे,नातेवाईक व जातीचे मंडळी ताव मारीत खाताना दिसतात. हाच नेता मंत्रालयातील मोठ-मोठी पदे भूषवित असताना कधी सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही कंपनी तू बघ, ही एजन्सी तुला घे किंवा हे टेंडर घेऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लाव असे म्हणताना दिसत नाही. तरी सुद्धा कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यकर्ता मात्र पक्षाचे काम करीतच असतो व आपला नेता आणखीन मोठा व्हावा हे ध्येय उराशी बाळगून पक्षात तहयात काम करीत असतो.
सध्याच्या राजकारणास विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळत चाललेली आहे. जो-तो नेता आपआपली चमडी वाचविण्याचा प्रयत्न करीत असतो त्यामुळे तो आज इथं तर उद्या तिथं असे चित्र पहावयास मिळत आहे. या सर्व बाबींचा सद्सद्विवेक बुद्धीने कार्यकर्त्यांनी विचार करावा आणि इतर पक्षातील, संस्थेतील व मंडळातील कार्यकर्त्यांबरोबर सलोख्याचे अतुट मैत्रीचे संबंध प्रस्थापित करावे. कारण हाच कार्यकर्ता तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. पक्षाच्या नियम, अटी व विचार गढूळ राजकारणामुळे अस्तव्यस्त झालेले आहे त्यामुळे तेवढ्यापुरते पक्ष, संस्था व मंडळाचा झेंडा हाती घ्या.