कुटुंबाची उपजिवीका भागविण्यासाठी काही तरूण दिवस रात्र कष्ट करतात. मिळणार्या तुटपुंज्या पैश्यातून कुटुंबाच्या गरजा भागवित असतात. दोन वेळेला अंडा भुर्जीचा गाडा लावणारा शाहबाज रौफ पठाण याचा नाहक बळी गेला. दारूच्या नशेत फुकट अंडी मागणार्या प्रविण मोरे याने कोणताही विचार न करता शाहबाजला गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि काही क्षणात सर्वत्र शोककळा पसरली.
अल्पसंख्यांक समाजाची सर्वच क्षेत्रात वाईट अवस्था आहे. अल्पसंख्यांक समाजातील तरूण कोणापुढे हात न पसरता स्वत:चा व्यवसाय करून कुटुंबाची उपजिवीका भागवीत असतात. काही वेळेला बा.न.प.च्या अतिक्रमण विभाग, पोलीसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असे हातगाडे बंद ठेवावे लागतात. कित्येक वेळा उपासमारीची वेळ सुद्ध येते. कोरोनामध्ये अशा छोट्या उद्योगधंद्यांना आर्थिक फटका बसलेला आहे. काहींनी तर हे व्यवसाय सोडून कोरोनात भाजी विक्री, दूध विक्री, पेपर विक्री (ज्याला कोरोनात मान्यता) असे व्यवसाय सुरू केले. त्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. मोठे व्यापारी नगरपालिकेला सांगून हे व्यवसाय बंद करण्यास सांगत आहेत कारण अत्याधुनिक बांधलेल्या मंडईत ग्राहक फिरकत सुद्धा नाही.
पोलीसांनी ही घटना घडल्यानंतर नागरीकांना आवाहन केले आहे की, व्यावसायिक तसेच इतर लोकांना विनाकारण त्रास देणार्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांबाबत माहिती असल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा किंवा 112 या आपत्कालीन नंबरवर माहिती द्यावी. हा झाला पुन्हा गुन्हा घडू नये म्हणून उपाय योजना. मात्र, शाहबाजचा नशेत असणार्याकडून मृत्यू होत असेल तर यात दोष कोणाचा? शाहबाजच्या मृत्यूस जबाबदार कोण? हा सुद्धा प्रश्र्न त्याचे कुटुंबिय, पै-पाहुणे, मित्र परिवाराला पडलेला आहे.
यापुढे बारामतीत अशा घटना रोखायच्या झाल्यास रात्री दहा नंबर सर्व अस्थापना बंद केले पाहिजे. अवैध दारू विक्रीवर कठोर निर्बंध घातले पाहिजेत. देशी दारू विक्रीचे दुकान दारांनी वेळेचे बंधन पाळले पाहिजे. काही दुकाने पहाटेपासुनच सुरू करून रात्री उशीरापर्यंत चालु असतात त्यामुळे अशा घटना होणे नाकारता येत नाही.