नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सवय अंगी बाळगावी – उपमुख्यमंत्री, अजित पवार

बारामती(उमाका): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील शहरे तसेच ग्रामीण भागात एक तारीख एक तास हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी या अभियानात सहभागी होण्याबरोबरच आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय प्रत्येक नागरिकाने अंगी बाळगावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत शाळा, महात्मा गांधी हाउसिंग सोसायटी, आमराई येथे स्वच्छता पंधरवडा ’स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर,, बारामती सहकारी बँकेचे संचालक सचिन सातव आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या श्रमदानाच्या कार्यक्रमाचे आवाहन केले आहे. त्याचाच भाग म्हणून संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपली वसुंधरा नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने कार्य करावे.

प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरातील कचरा कचराकुंडीतच टाकावा, स्वच्छतेच्या प्रती सर्वांनी सवय लावून घेणे गरजेचे आहे. सफाई कर्मचारी त्यांचे काम व्यवस्थित करतातच, पण नागरिकांनीही त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवावी. बारामती शहरात आज विविध ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत असून श्रमदान करून आपण सर्वांनी स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यांनी स्वतः आमराई, कर्‍हा नदीपात्र आणि संभाजी नगर येथे या अभियानात सहभागी होऊन उपस्थित नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी बारामती नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!