ई-फाईलींगमुळे कोणत्याही क्षणी इत्यंभूत माहिती मिळणार – मा.न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे

बारामती(वार्ताहर): ई-फाईलींग सुविधेद्वारे नागरीकांना आपल्या प्रकरणाची इत्यंभूत माहिती कोणत्याही क्षणी मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी केले.

जिल्हा व सत्र न्यायालय बारामतीत ई-फाईलींग व फॅसिलीटी सेंटरचे उद्घाटन करते समयी न्यायमुर्ती डेरे बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक हे होते. यावेळी बारामती अति.जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर, पुण्याच्या न्यायाधीश सोनल पाटील यांचेसह बारामती न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश-2 आर.के.देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-3 ऍड.जे.ए. शेख, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इम्रान मरछीया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे सदस्य ऍड.हर्षद निंबाळकर, ऍड.ए.यु. पठाण, ऍड.राजेंद्र उमाप, ई-फाईलींग सुविधा केंद्राचे जिल्हा प्रमुख पृथ्वीराज थोरात, इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. एन.एस. शहा, दौंड वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.कैलास गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे न्यायमूर्ती डेरे म्हणाल्या की, या सुविधेमुळे नागरीकांच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण होऊन कमी कालावधीत व खर्चात न्याय मिळण्यास मदत होणार आहे. स्व.विजयराव मोहिते यांच्यासोबत न्यायालयीन कामासाठी बारामतीत येत होते याची आठवण सांगत बारामती न्यायालय माहेर आहे. या ठिकाणी माझा सन्मान झाला याचा विशेष आनंद होत आहे. सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी वकिलांची कर्तव्ये आणि कृतीशीलता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे न्यायालयाने असंख्य केसेस निकाली काढुन राज्यात प्रथम क्रमांक कायम ठेवल्याबाबत जिल्हा प्रमुख न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण अध्यक्ष श्याम चांडक व सचिव श्रीमती सोनल पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बारामती येथील जिल्हा न्यायाधीश-2 जे.एल.गांधी यांचा निरोपानिमित्त सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहा.सरकारी अभियोक्ता परीक्षेत यश प्राप्त करणार्‍या 13 वकीलांचा सत्कार न्यायमूर्ती डेरे यांच्या शुभहस्ते घेण्यात आला.

वकील व पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा…
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा आणि बारामती वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने बारामती न्यायालयात येणार्‍या पक्षकार, वकीलांना ई-फाईलींग करणे सोयीचे व्हावे याकरीता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वकीलांना या सुविधा केंद्रातून प्रकरणाची सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने प्रकरणे दाखल करून तशी सुनावणी पूर्ण करता येणार आहे. तालुका स्तरावर संगणक, स्कॅनर, प्रिंटर, वेब कॅमेरा, माईक इ. उपकरणे बसविण्यात आली आहेत. या केंद्रात वकीलांच्या मदतीने 2 परिचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.उमेश काळे यांनी केले. सुत्रसंचालन ऍड.अनिल होळकर व ऍड.स्नेहा भापकर यांनी केले. शेवटी आभार ऍड.योगेश गाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बारामती वकील संघटनेने मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!