बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या संकल्पनेतून 2002 मध्ये बारामती गणेश फेस्टिव्हलची सुरूवात झाली त्या फेस्टिव्हलचे उद्घाटन 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी ना.अजित पवार व सौ.सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे किरण गुजर यांनी कळविले आहे.

फेस्टिव्हलचे (कोविड वर्ष वगळता) सलग 21 वे वर्ष आहे. दि 19 ते 28 सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत बारामतीकरांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटता येणार आहे.
दि.19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सायं.7 वा. भिमसेन जोशी यांचे शिष्य किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांच्या माझे माहेर पंढरी हा भजन-भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला.
दि.20 सप्टेंबर किर्तनातून जनजागृती करणारे ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तनास अलोट गर्दी झाली होती.
21 सप्टेंबर स्वरनिनाद प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सत्यम शिवम सुंदरम. 22 सप्टेंबरला पूनम कुडाळकर यांचा मराठी लावणी नृत्याचा कार्यक्रम या रावजी बसा भावजी. 23 सप्टेंबर मराठी नाटक करून गेलो गाव या मध्ये अभिनेते भाऊ कदम व ओंकार भोजने यांच्या भूमिका आहेत. रविवार 24 सप्टेंबर रोजी महिला वर्गाच्या मागणीनुसार महिलांकरिता स्वतंत्र लावण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन दु.4 वा. आहो नादाच खुळा आयोजित करण्यात आलेला आहे व हाच कार्यक्रम सायंकाळी 7 वा. सर्वांकरीता खुला आहे. या कार्यक्रमात माया खुटेगावकर, संगीता लाखे, प्राची मुंबईकर, अर्चना जावळेकर, नमिता पाटील हे लावणी नृत्य सादर करणार आहेत. 25 सप्टेंबरला प्यार महोब्बत और हसरते हा हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा. 26 सप्टेंबर रेट्रो ते मेट्रो हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा. 27 सप्टेंबरला दु.4 वा. स्थानिक कलावंतांचा कर्हेचे कलावंत कार्यक्रम व संध्या.7 वा. आ.अमोल मिटकरी यांचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे. 28 ला सकाळी 10 वा. पालखी मधून विसर्जन मिरवणूक होणार आहे. हे सर्व कार्यक्रम नटराज नाट्य मंदिर येथे होणार असून सर्व नागरिक बंधू भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असेही आवाहन किरण गुजर यांनी केले आहे.