बारामती(वार्ताहर): संपूर्ण देश अदृश्य कोरोना विषाणूशी लढा देत आहे. या रोगाने नागरीकांना खुप काही शिकविले आहे. जो-तो मला, माझ्या कुटुंबियांना या विषाणूपासुन वाचविण्याची प्रार्थना करीत आहे. विशेषत: घरातील लहान मुलं व वृद्धांना या विषाणूने जखडला नाही पाहिजे यासाठी कुटुंबातील व्यक्ती काळजी घेत आहेत. आमचं काय झालं गेले असं म्हणत, दुर्देवाने कुटुंबातील ज्याला अजुन हे जग पहायचे आहे, खेळायचे बागडायचे आहे अशा पाच वर्षाच्या आतील मुलांना कोरोना झाला तर संपूर्ण कुटुंब आपले दु:ख, यातना विसरून त्या चिमुकल्याकडे लक्ष ठेवून असतात.
नक्षत्र गार्डन विद्यानगरी येथील नटराज कोविड सेंटरमध्ये तब्बल 3 वर्षाचा प्रणय कांबळे यास कोरोना विषाणूने जखडले. आज दि.21 सप्टेंबर त्याचा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे प्रत्येक आई-वडिलांचा आनंद मुलासाठी गगनभरारी घेणारा दिवस असतो. या सेंटरचे व्यवस्थापन पाहणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष किशोर उर्फ पप्पू मासाळ यांनी काढलेल्या माहितीवरून त्याचा वाढदिवस नटराज कोविड सेंटरमध्ये साजरा करण्यात आला व प्रणयचे आई-वडिल व कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत केला. बा.न.प.शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अजिज शेख, सामाजिक न्याय विभागाच्या अधिक्षिका सौ.एस.बी.खारतोडे या यावेळी उपस्थित राहुन रूग्णांना सेवा देत आहेत.
आई-वडिल म्हणत असतात आम्ही जे काही करतो ते मुलांसाठीच… मग त्या मुलाला घडविणे, संस्कारक्षम बनविणे, चांगले विचार बिंबविणे, थोरा-मोठ्यांचा आदर्श घालून देणे इ. मधुन तो चांगला माणुस कसा घडेल हे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. मुलं कळते होत नाही तोपर्यंत त्याचा प्रत्येक क्षण त्या आई-वडिलांच्या स्मरणात असतो. त्यामुळे मुलांना काय झाले तर आई-वडिलच काय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पाच पकवान सुद्धा कडू लागतात हे खरे सत्य आहे. लहान मुले देवघरची फुले असतात असे म्हटले जाते. आज या प्रणयला काय माहिती त्याला काय झाले. संपूर्ण जग या विषाणूशी लढा देत आहे. तो सुद्धा याचा सामना करीत आहे.
नक्षत्र गार्डन पाठीमागे व इंदापूर रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील नटराज कोविड सेंटरमुळे कित्येक रूग्णांना दिलासा मिळाला. भिऊ नको नटराज तुझ्या पाठीशी आहे अशी एक थाप त्या रूग्णाच्या पाठीवर मिळाल्याने कित्येक रूग्ण बरे होऊन बाहेर पडत आहेत. नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड सेंटरचे उत्तम काम सुरू आहे. या कोविड सेंटरला भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.