बारामती(वार्ताहर): कृष्णा पेट्रोलियम पंपाचे मॅनेजरला पिस्तोलाचा धाक दाखवून मारहाण करणार्या पंपावरील कामगार आरोपी अक्षय धाईंजे व त्याच्या दोन साथीदारांना बारामती शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासात आरोपी जेरबंद केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
कृष्णा पेट्रोलियम पंपाचे मॅनेजर मयूर बाळासाहेब शिंदे हे 1 लाख 99 हजार रूपयांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी सायकलवरून पाटसरोडने निघाले असता, स्प्लेंडर दुचाकी वाहनावर तोंडाला मास्क लावून आलेल्यांनी वाहन आडवी मारून थांबवले व शिंदे यांच्या हातातील बॅग हिसकावू लागले. शिंदे यांनी प्रतिकार करून हातातील बॅग सोडली नाही. अज्ञात इसमांनी शिंदे यास मारहाण केली व डोक्यात पिस्तोलच्या मुठीने मारून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला तरीही शिंदे यांनी बॅग सोडली नाही. लोकं थांबू लागल्याने चोरटे पाटस बाजूकडे पळून गेले.
सदरची वार्ता शहर पोलीसांना कळताच त्यांनी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना कळविले. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाने तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
बारामती शहर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, बारामती तालुका, भिगवण, माळेगाव, वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही तासातच सदर गुन्हा उघडकीस आणण्यास यश प्राप्त झाले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, वाहन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग आहे काय याचा सखोल तपास सुरू आहे. आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून, यांच्यावर यापुर्वी विविध ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सपोनि सचिन काळे, सपोनि प्रकाश वाघमारे, सपोनि दिलीप पवार, सपोनि गंधारे, सपोनि गावडे, पोसई अमित सिदपाटील, तसेच सहाय्यक फौजदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, राजू मोमीन, सागर क्षीरसागर, अजित भुजवळ, विजय कांचन, अजय घुले, वाळासाहेव खडके, अतुल डेरे, गुरू जाधव, रामदास वावर, काशीनाथ राजापुरे व बारामती शहर पोलीस स्टेशनचे अक्षय सिताप, मनोज पवार, सागर जामदार, दशरथ इंगोले, यशवंत पवार, सचिन कोकणे यांनी सदरची संयुक्तीक कामगीरी केली.