अण्णाभाऊंनी कष्टकर्‍यांचे प्रश्र्न मांडले आणि विषमतेची उतरंड तोडून टाकली – नितीन शेंडे

बारामती(वार्ताहर): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी कष्टकर्‍यांचे प्रश्र्न जगासमोर मांडले आणि विषमतेची उतरंड तोडून टाकली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन शेंडे यांनी केले.

सोमेश्वर विद्यालयात अंजनगांव (ता.बारामती) येथे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुचेकर यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त व राज्याचे उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या 64 वा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वस्तू व खाऊ वाटप कार्यक्रमाप्रसंगी श्री.शेंडे बोलत होते.

यावेळी बारामती दूध संघाचे चेअरमन पोपट गावडे, ग्रामपंचायत अंजनगाव सरपंच सौ.प्रतिभा परकाळे, क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा सौ.कल्याणी वाघमोडे, माजी सरपंच दिलीप परकाळे, बाजार समितीचे मा.उपसभापती माणिक मोरे, प्रा.सुरेश साळुंखे, जालींदर वायसे, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष परकाळे, डॉ.सुजित वाघमोडे, सोमेश्र्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रणवरे, श्री.जमदाडे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे शेंडे म्हणाले की, फक्त दिड दिवस शाळा शिकलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सोसलेल्या वेदनेमुळेच त्यांच्या लेखणीला तलवारीची धार होती. महापुरुषांची जयंती उत्सव पुढील पिढीला प्रेरणा म्हणून साजरा करणे गरजेचे आहे वेळेचा सदुपयोग करता, आपल्या इतिहासात फक्त अभ्यासापुर्त न वापरता त्याचा उपयोग वर्तमान व भविष्यासाठी करताना योग्य दिशेने विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करावा असेही ते म्हणाले.

शेवटी आभार ग्राम सुरक्षा दलाचे दादा कुचेकर यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पारधी समाजातील युवक कमलेश भोसले ,याने मेहनतीने तसेच गणेश अवघडे या दोघांचेही पोलीस पदावरती निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!