बारामती(प्रतिनिधी): श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, प्रत्येकाने प्रसंगानुसार जे करायचे आहे ते केलेच पाहिजे असे प्रतिपादन बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.
बारामती नगरपरिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) बारामती शाखेस सामाजिक सभागृह उभारणीच्या भूमिपूजन समारंभा प्रसंगी सौ.पवार बोलत होत्या.
यावेळी मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे बारामती शहराध्यक्ष अविनाश बांदल, स्थानिक मा.नगरसेवक बाळासाहेब जाधव, मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, मा. नगरसेवक सुधीर पानसरे, कै.वस्ताद बाजीराव काळे दहिहंडी संघाचे संस्थापक अध्यक्ष ऋतुराज काळे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे सौ.पवार म्हणाल्या की, कृष्णांच्या लिलयावर सध्या खरं जग चालले आहे. प्रत्येक संघटना सांगत असते की तुम्ही ज्याला अवलोकन करता त्याचा प्रत्यक्षात वापर करा, अंगिकार करा. चांगल्या गोष्टींचे अवलोकन करा. तशाच चांगल्या गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितलेल्या आहे. श्रीकृष्ण लोणी चोरण्यापासुन ते गोपींना मागे पळविण्यापर्यंत, द्रोपदीचे रक्षण करण्यापासुन ते अर्जुनाला धडे देण्यापर्यंत तर गरज असेल तेव्हा युद्ध करायला व तसे वागण्यासाठी गरजेचे आहे हे त्यांनी सांगितलेले आहे.
ईश्र्वर जग चालवतो असे आपण मानतो. हाच ईश्र्वर अनेक देवांच्या रूपामध्ये आपण पाहतो. प्रत्येकाचे वेगवेगळे देव आहेत त्या देवांना ते मानत असतात आणि ही शक्ती हे सर्व चालवत असते.
बारामतीच्या विकासामध्ये भर घालणारी इमारत होणार आहे. इस्कॉनचा आणि माझा 1980 पासुन संबंध आलेला आहे. त्यामुळे हे मला नवखे नाही असेही ते म्हणाल्या.
आज या मंगलमय वातावरणात या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन झाले. त्याच वातावरणात इमारत उभी राहावी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी किरण गुजर, महेश रोकडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.काटे यांनी केले. सुत्रसंचालन अनिल रूपनवर यांनी केले तर शेवटी आभार ऍड.सुनिल पाटील यांनी मानले.