बारामती(वार्ताहर): वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि अजब तर्कटांसाठी प्रसिद्ध असलेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्याच्या निषेधार्थ बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना बारामती यांच्या वतीने बारामतीत निषेध सभा व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोहर कुलकर्णी यास तातडीने चौकशी करून अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दि.9 ऑगस्ट 2023 रोजी निषेध मोर्चा सकाळी 11 वा. कॉंग्रेस कमिटी गुणवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक, हुतात्मा स्तंभ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक ते प्रशासकीय भवन असा असेल. दु.12 वाजता हुतात्मा स्तंभ, वंदे मातरम चौक, (भिगवण चौक) येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निषेध सभा व निषेध मोर्चास कॉंग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी बिग्रेड, बौध्द युवव संघटना, आर.पी.आय. (आठवले- गट), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बारामती, बारामती तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, श्री.संत सावतामाळी संघ, बारामती तालुका, सावता परिषद बारामती यांनी एकमतांनी पाठिंबा दिलेला आहे.
तरी सदर निषेध सभा व निषेध मोर्चामध्ये बारामती मधील नागरिकांनी, व्यापारी, डॉक्टर, वकील, सर्व राजकीय पक्षांनी, सर्व संघटना, महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले विचारसरणीच्या सर्व जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.