बारामती(प्रतिनिधी): शहरातील तीन हत्ती चौक ते पंचायत समिती या मुख्य रस्त्यावरील रेल्वेच्या मालकीच्या जागेतील सेवा रस्ता करण्यावरून बारामती नगर परिषद व रेल्वेमध्ये वाद निर्माण झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार व खा.सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन हा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे बारामती नगर परिषेदेचे मा.गटनेते व बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रेल्वेच्या नियमांमुळे तांत्रिक अडचणी येत असल्याने हा रस्ता होण्यास विलंब होत होता. याभागात शाळा, महाविद्यालय, गार्डन, बँक, शासकीय कार्यालय,एमआयडीसी कडे जाणारा रस्ता असल्याने येथे लहान मुलांचा,महिला व वृद्धांचा वावर जास्त असुन रेल्वेच्या अडमुठे भूमिकेमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने 2021 मध्ये बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,मा.नगरसेवक गणेश सोनवणे यांनी जोरदार आंदोलन करत रेल्वेच्या माल धक्क्यावरील अवजड वाहने बारामती नगर परिषदेच्या जागेतून वाहतुक करण्यास मज्जाव केल्यावर,यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,खा.सुप्रिया सुळे, यांनी मध्यस्थी करत केंद्रातील रेल्वे प्रशासनाशी चर्चा करुन दोन वर्षे पाठपुरावा केल्यावर रेल्वेच्या अधिकार्यांनी सकारात्मक विचार करत तीन हत्ती चौक ते पंचायत समिती पर्यंत 750 मीटर रस्ता 35 वर्षाच्या करारावर 1 कोटी 31 लाख 78 हजार एवढी रक्कम देत करार केला आहे. सध्या या सेवा रस्त्याचे जलद गतीने काम सुरु झाले आहे.
यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे सचिन सातव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी मा.नगरसेवक गणेश सोनवणे,शहराध्यक्ष अविनाश बांदल,मंगेश ओमासे,सचिन मत्रे इ.उपस्थित होते.