शिक्षण हे प्रगतीसाठी एकमेव प्रभावी साधन : धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शिक्षण मिळणार – हर्षवर्धन पाटील

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): शिक्षण हे प्रगतीसाठी एकमेव प्रभावी साधन असुन एस.बी.पाटील ग्रुप ऑफ स्कूल वनगळीमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शिक्षण मिळणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील धनगर समाजातील 100 विद्यार्थ्यांना इ.1 ते 5 वी मध्ये इंग्रजी माध्यमासाठी चालू शैक्षणिक वर्ष 2023 -24 मध्ये मोफत निवासी शिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहेत. सदर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इ. 12 वी पर्यंतचे मोफत निवासी शिक्षण दिले जाणार आहे. धनगर समाज बांधवांनी या समाज कल्याण विभागाच्या मोफत निवासी शिक्षण योजनेचा फायदा घ्यावा असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम, निसर्गरम्य परिसर व वातावरण, शाळा व परिसरात सी.सी.टी.व्ही तसेच जेईई, नीट, एमपीएससी, यूपीएससीची पूर्वतयारी आदी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण विद्यार्थ्यांना तालुक्यातच दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सन 2008 मध्ये शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एस बी पाटील शैक्षणिक संकुलनाची निर्मिती करण्यात आली. त्या शैक्षणिक उद्देशाचा हेतू आज यशस्वी झाल्याचे समाधान आम्हांस आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा व शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एस बी पाटील शैक्षणिक संकुल मध्ये सध्या सुमारे 36 हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. येथे शिकलेले हजारो विद्यार्थी सध्या देशात, परदेशात उच्च पदावरती कार्यरत आहेत.

एस बी पाटील शैक्षणिक संकुल मध्ये सध्या नर्सरी पासून अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र पदवीपर्यंत सर्व शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शैक्षणिक संकुलमध्ये इंटरनॅशनल स्कूल, पब्लिक स्कूल, ज्युनियर कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज आदी विविध अभ्यासक्रमांची दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

आगामी काळात एस बी पाटील शैक्षणिक संकुल मध्ये एस. सी., एस. टी. विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. एस बी पाटील शैक्षणिक संकुलमध्ये शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांस विविध शिष्यवृत्या दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे स्मरणार्थ या शैक्षणिक संकुल मध्ये पदवी घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यास रु.5,000 ची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

यावेळी बाबासाहेब चवरे, विलासराव वाघमोडे, बाबा महाराज खारतोडे, जयकुमार कारंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी सुविधा उपलब्ध करून दिलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!