बारामती(वार्ताहर): बारामती तालुका व शहरात 14 दिवसाचा जनता कर्फ्युचा कालावधी पूर्ण झाला असुन दि.21 सप्टेंबर 2020 रोजी पासून सकाळी 9 ते रात्र 7 वाजेपर्यंत पानटपरी, हॉटेल, शाळा व जीम सोडून इतर दुकाने खुली राहणार असल्याचे आज व्यापारी व प्रशासनाच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बोलताना सांगितले. वडापाव, चहा च्या टपरी सारखे छोटे व्यवसाय सुरु करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दुकाने उघडणे व बंद करण्याचा कालावधी सात दिवसांचा असेल रूग्णांची संख्यांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, व्यापार्यांनी सोशल डिस्टन्स, सॅनिटाइजर व मास्क लावल्याशिवाय कोणत्याही ग्राहकास दुकानात प्रवेश देऊ नये. 14 दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे बाधित रुग्ण कमी झाले आहेत. संपूर्ण बारामती तालुका व शहरात प्रशासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम तंतोतंत राबविली आहे त्यास विविध संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचे घालुन दिलेल्या नियमांचे पालन केले जाणार आहे. जनता कर्फ्यूमुळे यश मिळाले आहे. 90 टक्के चाचण्या करण्यात आल्या आहेत. बारामती शहराच्या सर्व्हेमध्ये चाचण्यामध्ये नागरीकांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी आढळून आली आहेत. दि.21 सप्टेंबर पासून सर्व आस्थापना चालु करीत आहे. त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
प्रत्येक व्यापार्यांकडे थर्मल गन आणि ऑक्सिमीटर असणे गरजेचे आहे. यामुळे प्रशासनाला त्याची मदत होईल. मास्क, सॅनिटाइजर व सोशल डिस्टन्स चा वापर केल्यास कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवता येऊ शकतो असेही श्री.कांबळे यांनी सांगितले. वयोवृद्ध लोकांना बाहेर पडू नये यासाठी कठोर नियम करण्यात येईल. सर्वांनी मनापासुन नियमांचे पालन करून पुढचे लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. रँडमली तपासणी केली पाहिजे. एखाद्या दुकान, मेडीकल इ. ठिकाणाहुन सतत रुग्ण सापडत असतील तर त्यावर लक्ष ठेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नगरीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, पं.स.सभापती सौ. नीता बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, जवाहरशेठ वाघोलीकर इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी किरणराज यादव, राहुल काळभोर, सौ.पौर्णिमा तावरे, सौ.नीता बारवकर, सुशिल सोमाणी, प्रविण आहुजा, सागर चिंचकर, स्वप्नील मुथा इ. मनोगत व्यक्त केले. शेवटी जवाहरशेठ वाघोलीकर यांनी प्रशासनाने या 14 दिवसात जे सहकार्य केले त्याबाबत व्यापार्यांतर्फे सर्वांचे आभार व्यक्त केले.