माझे माहेर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस. माळशिरस तालुक्याच गाव. पण तालुक्याच गाव म्हणून विचाराल तर सरकारी कार्यालय, पंचायत समिती, आणि कोर्ट सोडलं तर गावात फक्त एकच हायस्कूल आणि मराठी शाळा. आताशा इंग्लिश मीडियम चा फॅड आले. फॅड याच्यासाठी म्हणाले कारण की ती गोष्ट आमच्या वेळी नव्हती ना म्हणून…
बाकी जत्रा यात्रेचे म्हणाल, तर आसपासच्या खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या मोठ्या जत्रा यात्रा व्हायच्या. पण माळशिरस मध्ये कोणती जत्रा किंवा यात्रा भरली नाही. नंतर काही वर्षांनी पुणे पंढरपूर रोडवर 58 फट्यावरती म्हस्कोबा ची यात्रा भरायला लागली.तोपर्यंत तर आमची लग्न होऊन आम्ही कधीच सासरी आलेलो. असे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी. मग वार कोणताही येऊ देत. तिथं बकऱ्याची, मेंढीची ची बळी देण्याची पद्धत आहे.
दक्षिणाभिमुखी मंदिराचे दार असलेले व पश्चिमाभिमुख असलेला मारुती हे गावाचे ग्रामदैवत. त्यामुळे हनुमान जयंती निमित्त गावात जत्रा असायची. अहो पण हनुमान जयंती असते दिवस उगवतीला ..त्यामुळे जत्रा भरली जायची भल्या पहाटे…आणि सकाळी 9 वाजेपर्यंत तर सगळकडे तिकडे….तर सांगायचा मुद्दा हाच की वर्षभर फक्त माऊलींच्या पालखीची वाट पाहणे एवढेच लहानपणीची एक्साइटमेंट. बरे ही एक्साइटमेंट कुणाला असते वारीच्या वाटेवर राहणार्या गावातल्या लोकांना आणि वारीमध्ये प्रत्यक्ष सामील होणाऱ्या वारकऱ्यांना.. बाकी मुंबई-दिल्ली करांना याची काय कल्पना??? त्यांनी फक्त घरात बसून टीव्हीवरच “आषाढी वारी” पहावी.
पण प्रत्यक्ष आषाढी वारीचा हिस्सा होणे म्हणजे अहो भाग्य… ते भाग्य पुणेकरांना पण लाभले बर का.. पण त्याला भाग्य म्हणायचं की आणखी काही ही यावर सविस्तर विचार करण्यासाठी माझ्या पप्पांनी लिहिलेली “दिंडी चालली पंढरपुरा..” ही कादंबरी वाचावी. त्यावर ती कादंबरी कळण्याचं आमचं वय नव्हतं..
म्हणजे आमच्या लहानपणी एंटरटेनमेंट ची एवढीही काही गरिबी नव्हती.तसं नाही म्हणायला अकलूजमध्ये शिवतीर्थावर जत्रा, सर्कस ,जादू चे खेळ, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटी हे चालूच असायचं.पण शेवटी आपल्या गावातल्या गोष्टींची मजा काही वेगळीच ना? नाही म्हणायला तेवढा कार्यक्रम गावात सार्वजनिक आणि हक्काचा असतो. चला परत मूळ मुद्द्यावर येऊ. म्हणजेच वारीच्या वाटेवर येऊ. तर सांगायचं असं होतं की माळशिरस मधून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीला जाते. जाते म्हणजे काय ?आहो एक रात्र मुक्कामी थांबते ना. आता तुम्ही म्हणाल एका रात्रीचे काय ते कौतुक. पण काही म्हणा लहानपणापासूनच आम्हाला त्याचं खूप आकर्षण आणि खूप अप्रूप पण..
म्हणून तर तीन चार वाजताच 58 फाट्यावर जिथं गावात पालखीचा प्रवेश होतो तिथं जाऊन बसायचं.. आणि जी अशक्य गोष्ट आहे ती करण्याचा प्रयत्न करायचा… म्हणजे काय तर वारकरी मोजायचे.. कंटाळा येईपर्यंत.. आत्ताच यासारखे वारकरी बरोबर सेल्फी काढायची सोय थोडी ना होती.. म्हणून दोन डोळ्यांच्या कॅमेरात जेवढं शक्य असेल टिपून घ्यायचं.. आणि मेंदूचं मेमरीत सेव करायचं.. म्हणून तर आतापर्यंत कितीही वेळा मेमरी ला फॉरमॅट केलं तरी त्या आठवणी काही जात नाहीत.. अंगात खरी सुरसुरी यायची ती सायकल बघितल्यावर जिच्यावर आमचा जीव अडकलेला असायचा म्हणजेच लहान लहान खेळणी ,फुगे पिपाण्या, साबणाचे फुगे करून उडवायच्या बाटल्या, ड्रम, पावा बासरी ,वेगवेगळे मुखवटे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कागदी भोंगा. जाड पुठ्ठा चा गोलाकार भोंगा. त्याशिवाय आम्ही पालखी ला गेलतो हे शेजार्यांना कसं कळणार? ज्या चिंच बनातून रात्री कराटेच्या क्लासवरून येताना भीती वाटायची पालखीच्या रात्री आम्ही तिथून बिनधास्त भोंगा वाजवत यायचो.
हे झाल शेजाऱ्यांसाठी. स्वतःसाठी जे पण काही घ्यायचं पुढे दोन-तीन दिवस शाळेत त्याची चर्चा व्हायची. त्यावेळी मॅचिंग काही घेणेदेणे नसायचा आम्हाला. म्हणजे मॅचिंग कशाबरोबर खातात हेच माहीत नव्हतं.त्यामुळे बिनधास्त शाळेच्या युनिफार्म वरती रात्री घेतलेले कानातले, बांगड्या ,टिकल्या, रबरबँड , चमकी लावलेलं काही-बाही बिनादिक्कत घालून जायचो. आणि विशेष म्हणजे त्याचं कौतुक व्हायचं हो सख्या मैत्रिणीकडून. एक-दोन वेळा तर रिंगण पाहण्यासाठी वारीच्या प्रवासाच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच सदाशिवनगर पर्यंत गेलेलो आहोत. उलट जाताना प्रवास जेवढा अवघड तितकाच येताना सोपा. येताना फक्त रस्त्याच्या मधोमध उभे रहा. आपोआप ढकलत ढकलत ढकलत माळशिरस पर्यंत येता येत. कुणाला धक्का लागू नये किंवा लागलाच तर फक्त “माऊली” ” माऊली” “माऊली” एवढाच जप करावा. वारीमध्ये एकमेकांना माऊली नावाने हाक मारण्याची प्रथा आहे. जस आपण इतर वेळी अनोळखी माणसाला ” अहो पावन तुम्ही कुठल्या गावचे?” असं विचारता तसं वारीमध्ये ” माऊली तुम्ही कुठल्या गावचे?”असे विचारतात.
पालखीतळावर विश्रांतीला पोचली की संध्याकाळी बरोबर 7 वाजता, त्यांची बैठक असायची. थोडक्यात दिवसभराची मिटिंग. कुणाचं काय हरवलं ,सापडलं, एखादा नवीन वारकरी त्याची दिंडी चुकला तर या मिटिंग मध्ये त्याचा मेळ बसायचा. बऱ्या बैठकीची सुरुवात कशी व्हायची माहिती आहे का? फक्त एक चांदीची काठी उभारली, की बसलेले हजारो वारकरी चिडीचूप राहायचे. आणि मग हजारोंचा जनसमुदाय असलेल्या त्या पालखीतळावर शिस्तप्रिय शांतता पसरायची. बास तेवढी पसरणारी शांतता दाखवण्यासाठी पप्पा आम्हाला सहा वाजता घेऊन जायचे. शिवाय आमच्या घरी पंधरा ते वीस वारकरी मुक्कामी यायचे. म्हणून सात वाजताची बैठक झाली की आम्ही परत यायचो. कारण त्यांची बडदास्त ठेवायला. ते काम करताना खूप छान वाटायचं. जणू एखाद्या लग्नाचे वराड आमच्या घरी मुक्कामी उतरले.
त्यांना जेवू घालून पायांना तेलाची मालिश करून द्यायची. आत्ता माझा भैय्या आणि त्याची मुलांनी ही सवय अशीच पुढे चालू ठेवली आहे.. एकदा चे वारकरी झोपले की मग आमची स्वारी निघायची पालखी तळाकडे. बर घरातले सगळ्यांना जायचं म्हटलं तर एवढी मोठी गाडी नको का? आणि गाडी असून तरी उपयोग काय हो.. त्या पुणे पंढरपुर रोड वर अक्षरशा लाखो लोक रात्रंदिवस चालत असायचे.. कधी जर सायकल पंचर झाली तर एक किलोमीटरच्या शाळेपर्यंत कुरकुर करणारे आम्ही, तीन किलोमीटरच्या पालखी तळापर्यंत उड्या मारत जात असू. मग मध्यरात्रीपर्यंत पालखीचे दर्शन , खेळणी ,कानातले ,गळ्यातले, यासाठी फिरण्यात जायची. आजकालच्या मुलांना फुगे म्हटलं कि शेकड्यावर फुगे असणारी फुग्याची पाकिटे भेटतात.त्यामुळे त्यांना सांगूनही खरे वाटणार नाही की आम्ही केवळ एक रुपयाला मिळणार्या एका मोठा फुगण्यासाठी किती हट्ट करायचो.
त्याची ते इलास्टीक रबर हातात पकडून घरापर्यंत जपून आणण्यात केवढी मोठी कसरत व्हायची. पालखी ला गेल्या गेल्या फुगेवाला दिसला तेव्हापासून एका फुग्यासाठी हट्ट. मोठ्या माणसांनी “फुटेल तो जाताना घेऊ” हे किती वेळा समजून सांगितलं तरी समजून घेण्याचं वय थोडीं होतं ते. माझं तर उत्तर तयार असायचं” मग आता एक घ्या आणि फुटला कि घरी जाताना परत घ्या. आणि दोन ते तीन फुगे जरी रडून-रडून घेतले तरी घरी येईपर्यंत फक्त माझ्या छोट्या बहिणीचा तेजू चा फुगा टिकायचा. मग घरी आल्यावर हाताने उडवून उडवून तो खेळायचा. दुसऱ्या दिवशी त्यातली हवा जाऊन तो बारीक व्हायचा.त्याचा जीव गेला तरी आम्ही त्याचा पिच्छा सोडायचो नाही. तोंडात आत मध्ये जोरात ओढून त्याच्या “चींट्या” बनवायचो. दुसऱ्याच्या डोक्यात फोडण्यासाठी. आता एवढ्याशा रबराच्या चिंट्या कशा बनवायचं त्याच्यासाठी जन्मजात कौशल्य लागतं. ते आजकालच्या पोरांना शिकवून पण येणार नाही. कारण त्यांच्या हायजेनिक मम्मी फुग्याचे रबर तोंडात घालून देणार नाहीत. पण पालखीचे मुख्य आकर्षण म्हणजे वर्षातून फक्त एकदाच भेटणारा मोठा पाळणा. पालखी दर्शनापेक्षा संपूर्ण लक्ष मोठ्या पाळण्याच्या तिकिटाच्या रांगेकडे असायचं. परत वर्षभर बसायला भेटणार नाही म्हणून मोठा पाळणा कधी चुकला नाही. पादुका दर्शनपेक्षा रिंगणाच्या घोड्याचे दर्शन आकर्षित करायचं. पादुकांचे महत्व कळायला आमचं बालपण mature नव्हते ना.
आणि दर्शनाचे महत्व म्हणाल तर ते घरी माऊलींचे पायाला तेल लावताना मालिश करताना होऊन जायचं. पहाटे पाचला माऊलींची आरती करून माउलींना निरोप देऊन घरी यायचं. बरं निरोप देताना रांगोळीच्या पायघड्या घालायच्या. पण त्यावेळी कधी मनातही आले नाही की उगीच कशासाठी ही रांगोळी काढायची? लगेच दोन मिनिटात पुसली जाणार आहे… सांगितलं ना अजून एवढा व्यवहारिक दृष्टीकोन आलेला नव्हता. तेवढ्यात घरी मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना निघण्याची गडबड असायची. त्यांना निरोप देताना जीवावर यायचं.. आणि दिवस उगवतीला जीवाला हुरहूर लावून माऊली पंढरपूर कडे रवाना व्हायची…
बर एवढ्या वर पालखीचे वेड संपेल ते बालपण कसलं??? शिळ्या पालखीची ही आम्ही तितक्याच आतुरतेने वाट पाहायचो. शिळी पालखी म्हणजे पंढरपूर वरून परत आळंदी कडे जाणारी. शिळ्या पालखीत सगळ् स्वस्त असत ही त्यावेळची आमची निरागस अंधश्रद्धा. शेवटी शेळी काय आणि ताजी काय आमच्यासाठी पालखी ही जत्रा यात्रा यापेक्षा सुपर से उपर होती.
© सौ अभिजिता नवनाथ जगताप
abhijita.jagtap@gmail.com