बारामती(वार्ताहर): म्हणे, अचानक राजकारणात भूकंप झाला आणि सर्वत्र तू-तू, मै-मै सुर झाली. अक्षरश: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्षेनते आ.अजित पवार आमदारांना घेऊन भाजप-शिवसेना सरकारला मिळाले आणि सर्वत्र बंडखोरांचा चांगलाच विषय रंगला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या बारामतीत तर्क-वितर्क चर्चेला उधान आले. काहींच्या मते अजित पवार यांनी बरोबर केले तर काहींच्या मते देवाचे देव महादेवाला विठ्ठल व त्याचे वारकरी विसरले अशा गप्पा रंगू लागल्या. कोणी ठामपणे व्यक्त होत नव्हते तर कोणी साधी प्रतिक्रीया देण्यास तयार नव्हते. अशी स्मशान शांतता बारामतीत झाली होती.

अशात आ.अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने काहींनी चौका-चौकात फ्लेक्स बाजी करून आनंद व्यक्त केला. मात्र, धर्मांधाबाबत सतत बोलणारे, फुले,शाहु, आंबेडकर विचारधारा समाजात रूजवून मते मिळविणारे आ.अजित पवार व इतर आमदार पवार साहेबांना सोडून गेले. त्या निषेधार्थ सामाजिक क्षेत्रात काम करणार्या सुलतान ग्रुप मधील मुस्लिम युवकांनी साहेब आम्ही तुमच्या पाठीशी असा फ्लेक्स कॉंग्रेस कमिटी समोर लावला. या फ्लेक्सवर बारामतीच्या लोकप्रिय खा.सुप्रिया सुळे व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा फोटो होता.
तापत्या तव्यावर पाणी टाकावे अशी काहींची अवस्था झाली. त्यांनी थेट नगरपालिकांसह इतर खात्यात फ्लेक्स काढणेबाबत दबावतंत्राचा वापर केला. काही वेळातच नगरपालिकेची यंत्रणा फ्लेक्स काढण्यास आले. आता फ्लेक्स निघणारच अशा अवस्थेत कॉंग्रेस ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष व नाना पटोलेंचे अत्यंत जवळचे रोहित बनकर यांची एन्ट्री याठिकाणी झाली. त्यांनी फ्लेक्स न काढणेबाबत संबंधितांना सांगितले. यावेळी बनकर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांना फोनद्वारे जे काही सांगायचे ते सांगितले आणि जसाच्या तसा फ्लेक्स डौलाने उभा राहिला.
रोहित बनकर यांनी महाविकास आघाडीचा मान राखला आणि राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा लावलेला फ्लेक्स काढण्यासाठी आलेल्यांना परतीचा मार्ग दाखवला.
महाविकास आघाडीचे नेते आ.अजित पवार भाजप-शिवसेना सत्ताधिकार्यांबरोबर जरी गेले असले तरी पवार साहेब आजही महाविकास आघाडीचा धर्म पाळीत आहेत. अशा नेत्याचा, वृत्तीचा व आदर्शचा मान ठेवत रोहित बनकर रिंगणात उतरले. या कार्यातून बनकर यांची एकनिष्ठता कॉंग्रेस पक्षावर व महाविकास आघाडीवर असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
येणार्या काळात महाविकास आघाडी राहिल अथवा न राहिल मात्र, सध्या तरी पवार साहेब महाविकास आघाडीचा धर्म पाळीत आहेत व ते प्रमुख नेते आहेत असे रोहित बनकर यांनी यावेळी सांगितले.