आयर्नमॅन झालेल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व्यायामाचा अंगीकार करावा – रणजीत पवार

बारामती(वार्ताहर): दैनंदिन कामाच्या कोणत्याही सबबी न सांगता, बारामतीतील 8 आयर्नमॅनचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी इथून पुढे आळस झटकून व्यायामाचा अंगीकार केला पाहिजे असे मत बारामती औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजीत पवार यांनी व्यक्त केले.

अस्थाना, कझाकीस्थान येथे 2 जुलै रोजी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत आयर्नमॅन किताब पटकाविणार्‍यांचा बारामतीकरांनी वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. तद्नंतर डेंगळे गार्डन मंगल कार्यालय येथे आयर्नमॅन्सचा सत्कार समारंभ प्रसंगी श्री.पवार बोलत होते.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे विश्र्वस्त डॉ.हेमंत मगर, राजू भिलारे, आर.एन.शिंदे, नाना सातव इ.मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.पवार म्हणाले की, बारामतीकरांसाठी हा अतिशय गौरवाचा क्षण आहे. 23 ते 51 या वयोगटातील 8 मंडळी आयर्न मॅन सारखी खडतर स्पर्धा जिंकतात ही काही सोपी गोष्ट नाही. त्यातही वैष्णवी, सादिया आणि रजनीश या त्यांच्या वयोगटात जगात पहिल्या तीन क्रमांकाने यश संपादन करीत असतील तर ही अभिनंदास्पद बाब आहे.

सायंकाळी 5:30 वाजता कसबा येथील छ.शिवाजी उद्यान श्रीगणेश आरती आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन करून छ.शिवाजी उद्यान ते डेंगळे गार्डन अशी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या मिरवणुकीत बहुसंख्येने बारामतीकर, महिला-भगिनी आणि अबालवृद्ध आयर्नमॅन्स च्या कौतुकासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी सर्व आयर्नमॅन्स उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फेटा, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

आयर्नमॅन्सनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, इथपर्यंतचा प्रवास, डाएट, खडतर सराव, कझाकीस्थान येथील वातावरणाशी जुळवून घेत असतानाचे अनुभव याविषयी उपस्थितांशी संवाद साधला. बारामतीपासून ते कझाकीस्थान येथील आयर्नमॅन किताब जिंकेपर्यंतच्या प्रवासाची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली.

या सर्व आयर्नमॅनचे प्रशिक्षक ट्रीपल आयर्नमॅन सतिश ननवरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, वेगवेगळ्या क्षेत्रांतील हे स्पर्धक अतिशय खडतर सराव, काटेकोर आहाराचे नियमन करून इथपर्यंत पोहोचले आहेत. यातील बर्‍याच जणांना स्वमिंग, धावण्याचा सराव देखील नव्हता मात्र, सार्‍या अडचणींवर मात करत या सर्व मंडळींनी जगातील सर्वांत खडतर स्पर्धा पूर्ण केली याचा विशेष आनंद आहे. ननवरे यांनी फिटनेस विषयक भेटवस्तू देखील या प्रसंगी प्रदान करण्यात आली.

22 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनद्वारे आयोजित करण्यात येणार्‍या आरोग्यवारी -2023 या चौथ्या सत्राच्या नावनोंदणीचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्या सौ.सपना सतिश ननवरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मामा जगताप यांनी केले तर शेवटी आभार उद्योजक निखिल थोरवे यांनी मानले. यावेळी बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्य, बहुसंख्येने बारामतीकर उपस्थित होते.

यशस्वी आयर्नमॅन….

बारामती स्पोर्ट्स फौंडेशनचे सदस्य राहुल पाटील (इंडियन रेल्वे सर्व्हिसेस), तुषार चव्हाण (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस), राहुल मोकाशी (इंजिनइर), मच्छिंद्र आटोळे (ग्रामसेवक वय-51वर्षे ), सादिया सय्यद (अल्ट्रा रनर, इंजिनइर), अजिंक्य साळी (क्रीडा शिक्षक), रजनीश गायकवाड (ऍथलिट्स) आणि वैष्णवी ननवरे (आर्किटेक्ट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!