बारामती(वार्ताहर): येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.ग.भि.देशपांडे माध्य. विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी आयएएस अधिकारी प्रतिक जराड यांच्या उपस्थितीत पार पडला .
यावेळी बारामती जिल्हा संघचालक दिलीप शिंदे, शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी, उपमुख्याधापक धनंजय मेळकुंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसो बडदे, पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका अनिता तावरे हेही उपस्थित होते .
यावेळी दहावी, बारावी व विविध शिष्यवृत्ती परीक्षा मधून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव संस्थेच्या वतीने वाचनीय पुस्तके व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी मान्यवरांकडुन सर्व शिक्षक बंधू भगिनींना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
आज शिक्षण देणारे अनेक स्रोत निर्माण झाले आहेत, परंतु मूल्यवर्धित व आनंददायी शिक्षण फक्त शाळाच देऊ शकतात, शाळेमुळेच सामाजिक ऐक्य निर्माण होते तसेच आयएएस अधिकार्यांच खरं काम समाजातील समस्या दूर करून सामाजिक बदल घडविणे होय असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयएएस अधिकारी प्रतिक जराड यांनी मांडले.
विनम्रतेचे बाळकडू शाळेतूनच मिळतात . शाळा ही सामाजिक दायित्व असणारे मंदिर असून यातून शिक्षण घेवून बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांनी या भारतभूची सेवा करावी असे आवाहन अध्यक्षीय मनोगतात डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी संपूर्ण शालेय परिसर ’प्लास्टिक मुक्त झोन’ करण्याचा संकल्प करण्यात आला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या वतीने शाला समिती अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, स्थानिक सल्लागार समिती सदस्य राजीव देशपांडे, फणेंद्र गुजर, पर्यवेक्षक राजाराम गावडे, शेखर जाधव, चंदु गवळे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांनी तर सूत्रसंचालन सविता सणगर यांनी केले व आभार रविंद्र गडकर यांनी मानले.