अंजनगाव(वार्ताहर): मी कुठे बसत होतो…मला इथं सरांनी मारलं होतं…माझ्या शेजारी हा होता…आपल्याला हे शिक्षक होते… अशा चर्चांना उधान आले बघता बघता 26 वर्ष कसे निघून गेले हे आजही वर्गात बसल्यानंतर माजी विद्यार्थ्यांना कळेनासे झाले.
निमित्त होते अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयातील 1996-97 मधील माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थी 26 वर्ष मागे गेले आणि दहावीचा वर्ग पुन्हा गजबजला. 26 वर्षांनी त्याच ठिकाणी, त्याच वर्गात पुन्हा भेटल्याने सर्व भावुक झाले होते. एकमेकांच्या खुशाली विचारीत, सुख-दु:खाची आठवण काढीत गाठीभेटी व गळाभेट केली.
या विद्यालयाच्या इतिहासात पहिला माजी विद्यार्थी मेळावा झाला. यामुळे सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये मोठा उत्साह होता. शाळेचे माजी मुख्याध्यापक घाटगे सर कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यमान मुख्याध्यापक शरद रणवरे, ज्येष्ठ शिक्षक देवकाते सर, चव्हाण सर, घरजारे सर, साबळे सर, भोसले सर, शिंदे सर, सोनवणे सर, कुचेकर सर, चांदगुडे सर, घारपुरे सर, शिर्के मॅडम, सय्यद मॅडम यांच्यासह आजी-माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना फेटे बांधण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गुरूपौर्णिमेच्या औचित्य साधत उपस्थित सर्व गुरुजनांचे माजी विद्यार्थिनींनी पुजन, वंदन करून पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. नुकतीच विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी रणवरे सरांची नियुक्ती झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्या शाळेतून आपण घडलो, पुढे गेलो त्या शाळेला माजी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयासाठी पुस्तके, दोन फॅन भेट दिली. शाळेतील पहिला माजी विद्यार्थी मेळावा असल्याने शिक्षकांनी कौतुक केले. जुन्या आठवणींना उजाळा देत काहींचे डोळे पाणावले होते. विद्यार्थी भेटीने शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले. विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे संगीत खुर्चीचा खेळ खेळत हे ऋणानुबंध अधिक घट्ट केले. शाळेच्या आवारात इतक्या वर्षांनी पुन्हा भरलेला हा वर्ग सर्वांच्याच कायम स्मरणात राहील, अशीच भावना होती. वृक्षारोपण आणि स्नेहभोजनाने मेळाव्याचा समारोप झाला. कार्यक्रमांचे संपूर्ण संयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले होते.