मुंबई: जोपर्यंत सामान्य माणसांच्या अंतकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोल आहे तोपर्यंत काहीही चिंता करायचे कारण नाही असे वाय बी सेंटर सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.शरदचंद्रजी पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही. निवडणूक आयोगानं घड्याळाची खूण कुणाला दिली, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. तुमच्यासाठी सांगतो, ती खूण (घड्याळ) कुठेही जाणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे की एखादी खूण (पक्षचिन्ह) देशाचं राजकारण ठरवत नाही.
नाशिक पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेतला त्यावर पवार साहेब म्हणाले की, जेव्हा मी कॉंग्रेसमध्ये होतो. तेव्हा टिळक भवन आमच्याकडे होते. त्यानंतर जेव्हा आम्ही नवीन पक्ष काढायचा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही टिळक भवन सोडून दिले. कारण ती मालमत्ता कॉंग्रेस पक्षाची होती. ती मालमत्ता हिसकावून घ्यायची आम्हाला आवश्यकताही नव्हती.
पुढे पवार म्हणाले मी 1967 साली पहिली निवडणूक लढलो. त्यावेळी माझे चिन्ह बैलजोडी होती. कॉंग्रेसची खूण बैलजोडी होती. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यामुळे कॉंग्रेसचे बैलजोडी हे चिन्ह गेले. त्यानंतर गाय-वासरू चिन्ह मिळाले. नंतरच्या काळात चरखा आणि हात (पंजा) ही चिन्हे मिळाली. सर्वात शेवटी मला घड्याळ चिन्ह मिळाले असेही ते म्हणाले.