पुणे(मा.का.): पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 241 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.सीमा होळकर यांनी केले आहे.
बारामती आणि दौंड तालुक्यातील प्रत्येकी 3, मावळ -36, खेड-10, आंबेगाव-19, इंदापूर-6,वेल्हे-70,जुन्नर-16, पुरंदर-18, हवेली-22, भोर आणि शिरुर प्रत्येकी 9 आणि मुळशी तालुक्यातील 20 अशा जिल्ह्यातील एकूण 241 गावांत रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे.
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात गावांची नावे, सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित तहसिल कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.
तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणार्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी कळविले आहे.