बारामती(वार्ताहर): दहावी बारावीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा यापुढील काळ खरा संघर्षाचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी केले.
संसदरत्न बारामतीच्या लोकप्रिय खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण व 10 वी 12 वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाप्रसंगी श्री.पाटील बोलत होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, माळेगाव कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण, मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव, माजी नगरसेवक निलेश इंगुले, संतोष जगताप, नितीन बागल, निलेश मोरे, आदित्य हिंगणे, संजय रायसोनी इ.मान्यवर उपस्थित होते.

पुढे पाटील म्हणाले की, खा. सुप्रियाताई या स्वत:च्या कतृत्वावर निवडून येतात. संसदेत सर्वांत जास्त उपस्थिती, प्रश्र्न मांडण्यामध्ये सुप्रियाताई आघाडीवर आहेत. यामुळे त्यांना आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. भाग्याची गोष्ट आहे की, ताईंनी पवार साहेबांच्या पोटी जन्म घेतला आहे. नाम तो माता-पिता देते है, काम तो तुमको करना पडता है असेही त्यांनी ताईंबाबत प्रशंसा करीत सांगितले. दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांनी रात्रीचा दिवस करून कष्ट, मेहनत करून उत्तीर्ण झाले चांगले गुण मिळविले आहेत. अशावेळी त्यांच्या पाठीवर थाप दिली पाहिजे ती थाप मा.नगरसेवक सत्यव्रत उर्फ सोनू काळे यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गुण कमी मिळाले म्हणून खचून जावू नका, गुण कमी मिळणारे सुद्धा पुढे प्रचंड प्रसिद्ध झाले असल्याचे भारतरत्न सचिन तेंडूलकर यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले. सोनू काळे हे गेली सहा वर्षापासुन सामाजिक उपक्रम राबविण्यामध्ये सातत्य ठेवत आलेले आहेत ही खूप मोठी बाब आहे. आपले नेते रत्नपारखी आहेत त्यामुळे चांगले काम केल्यावर विविध संधी मिळत असते त्यामुळे येणार्या काळात सोनू काळे नगरसेवकच काय तर नगराध्यक्ष सुद्धा होतील असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या दरम्यान प्रभागात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बारामती बँकेचे मा.अध्यक्ष श्रीकांत सिकची, विजय आगम, नगरपालिकेचे उद्यान विभागाचे मस्जिद पठाण, जमीर इनामदार, ऍड.अनुप चौगुले, ऍड.संदीप शिंदे, आप्पा वाघ, रियाज इनामदार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राजेंद्र ढवाण, नवनाथ बल्लाळ, आलताफ सय्यद, विशाल जाधव यांनी ताईंना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तैनुर शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बनसोडे यांनी केले तर शेवटी आभार मा.नगरसेवक सत्यव्रत उर्फ सोनू काळे यांनी मानले. यावेळी आई प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.