बारामतीः दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तीक गुरू-शिष्याच्या जयंतीनिमित्त रविवार दि.13 एप्रिल 2025 रोजी दु.1 ते 6 या कालावधीत साळुंके हॉस्पीटल समोर, इंदापूर रोड, बारामती याठिकाणी अन्नदान कार्यक्रम आयोजित केला असल्याचे लोकशाही संस्था व अनिल मोरे समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
सदरचा कार्यक्रम लोकशाही संस्था व अनिल मोरे समर्थक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेला आहे. गेली दहा वर्षे झाली अनिल मोरे अन्नदान कार्यक्रम करीत आले आहेत. दुपारी साडेबारा वाजता समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने पुजापाठाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे ॲड.संदीपबाबा बनसोडे, संतोष शिंदे, अजयदादा लोंढे, चेतनभैय्या जाधव यांनी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्नदानाबाबत अमूल्य असे विचार मांडलेले आहेत. त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि भूक या समस्यांवर अत्यंत संवेदनशीलतेने विचार केला होता. अन्नदान या विषयाला ते केवळ धार्मिक वा पारंपरिक दृष्टिकोनातून न पाहता, सामाजिक न्यायाच्या व्यापक चौकटीत त्यांनी पाहिले होते.
डॉ.आंबेडकर यांचे मानणे होते की, भूक ही माणसाच्या प्रतिष्ठेला हादरा देणारी गोष्ट आहे. जेव्हा कुणालाही उपासमारीचा सामना करावा लागतो, तेव्हा तो माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहतो. त्यामुळे अन्नदान हे केवळ दया नव्हे, तर माणुसकीचे कर्तव्य आहे.
“भुकेल्या माणसाला आधी अन्न द्या, मग धर्म वा तत्वज्ञान सांगा.“ या विधानातून त्यांची मानवी गरजांप्रती असलेली कणव आणि समाजातील समतेची तळमळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दिसून येते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अन्न, शिक्षण आणि निवारा या मूलभूत गरजांवर भर दिला. त्यांनी दलित, गरीब, शोषित वर्गाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे अत्यावश्यक मानले. अन्नदान यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते असेही त्यांचे म्हणणे होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्यांनी बुद्धाच्या करुणा, दया आणि समतेच्या शिकवणुकीचा पुरस्कार केला. बौद्ध परंपरेत अन्नदान हे ‘महादान’ मानले जाते. त्यांनी या दृष्टीकोनातून देखील अन्नदानाचे महत्व अधोरेखित केले.
या सर्व बाबींचा विचार करीत अनिल मोरे व त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी न चूकता अन्नदानाचा कार्यक्रम राबवीत आलेले आहेत.