महात्मा फुल्यांची श्रेष्ठ प्रेरणा-समता-मानवता

                             प्रविण बागडे, नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919

महात्मा फुले हे केवळ चार्तुवर्ण्यावर-ब्राम्हण श्रेष्ठत्वावर एकूण विषमताधिष्ठीत हिंदू धर्मावर आघात करुन थांबले नाहीत. तो त्यांच्या बंडखोरीचा केवळ आवश्यक आणि प्राथमिक असा विघ्वंसक अविष्कार होता, पण त्याहूनही श्रेष्ठ अशी फुल्यांची प्रेरणा होती. ती म्हणजे संपूर्ण समतेची, बंधुत्वाची, मानवतेची, विश्वकुटुंबाची त्यामध्ये वर्ण, जात तर सोडाच पण देश, धर्म, वंश या मधिल भेदांना त्यांच्या वृथा अभिमानाला यकिंचितही वाव नव्हता. वंश, धर्म, देश, कृत्रिम मनुष्यनिर्मिती, भेदभाव आहेत. त्यामुळे मुठभर स्वार्थी लोकांचाच स्वार्थ साधतो, त्यासाठी ते सामान्य जनतेमध्ये नसते भेदभाव, विषमता, राग-द्वेष निर्माण करतात. त्यापासुन द्वेष नाही. वंश, धर्म, देश मुक्त नाही, म्हणुन या सर्वांचा विलय करुन त्याहून श्रेष्ठ अशा मानवतेची, समानतेची, स्वातंत्र्याची, विश्वकुटुंबाची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे, ही खरी फुल्यांची प्रेरणा होती, शिकवण होती.

एकविसाव्या शतकाकडे नजर लावून बसलेल्या भारतात शिक्षण तळागाळापर्यंत पोहचू शकलेलं नाही हे वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आजही समाजात हक्कांची जाण आहे. पण कर्तव्याचा विसरच पडला आहे. आजही दीनदुबळे दलित अन्याय सोसतच आहेत. परहिता साठी अष्टाप्रहर राबणारा, झिजणारा शेतकरी, कामकरी, श्रमजीवी आजही दारिद्रयाचे आणि अन्यायाचे चटके अनुभवतच वाटचाल करत आहे. शहरे सोडली तर आजही खेडोपाडी, डोंगरी भागात छोटी छोटी मुलं कामाला जुपली जात असल्यानं शिक्षणाला वंचितच आहेत. शांतता वर्षातही शांतता औषधालाही नाही. उलट जिकडे तिकडे द्वेषाचे, विद्रोहाचे अशांत वातावरण खदखदत आहे. आजही साक्षरतेचे प्रमाण फारच कमी आहे. महात्मा फुल्यांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा काढली आणि ज्ञानांच दालन त्यांच्यासाठी खुले केले हे जरी खरे असले तरी विषमता आणि जातीभेद यांना आज देखील पूर्णपणे मुठमाती मिळू शकलेली नाही, ही वास्तविकता आहे.

शिक्षणाचा प्रसार जर तळागाळापर्यंत झाला तरच क्रांती होईल असं तर ”विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शुद्र खचले”. शंभर वर्षापूर्वीची हिच स्थिती आजही आहे. माणसाच्या समुद्रात आज माणुसकीच हरवली आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता याचं आजही पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. बंधुभाव फक्त ओठातच आहे.अशी स्थिती पाहिल्यावर महात्मा फुल्यांसारखी माणसं का बरं अस्वस्थ होणार नाहीत. आज जर महात्मा फुले आपल्यात असते तर त्यांनी आपल्या परखड विचारांच्या पवित्र्यांनी द्वेष, भ्रष्टाचार, अन्याय, दरिद्रय यांचा अंध:कार दूर करायचा नक्कीच प्रयत्न केला असता. आणि मग या विषयावर बोलायचा कदाचित प्रसंगही आला नसता.

हिंदू समाजातल्या मतलबी रुढींचा त्यांना तिरस्कार वाटू लागला. ज्योतिबांने शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करतांनाच 1847 पर्यंत ज्योतिबा बुध्दिने चांगले प्रौढ झाले होते. त्यांनी समाजाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यातून त्यांच्या असे लक्षात आले की, आपला हिंदु समाज जातीभेदाने आणि विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरीत राहिल्याने प्रतिगामी बनला आहे. स्त्रियां आणि शुद्रांची कुचंबना होत आहे. हे सर्व स्त्रियां आणि बहुजन समाज शिक्षणापासुन दुर राहिल्यामुळे घडत आहे, असे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यावरुन त्यांनी भावी जीवनातील कार्याची दिशा ठरविली. ते सरकारी नोकरीच्या मागे न लागता समाजकार्य करायचे ठरवून कामाला लागले. सामाजिक गुलामगीरी दूर करणे आणि सर्वांना शिक्षणाची दारे खुली करणे त्यासाठी प्रयत्नशील राहणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरले.

हे कार्य तत्कालीन रुढीप्रिय समाजाला रुचले नाही. मुलींची शाळा काढण्यासाठी पूर्व तयारी म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला प्रथम शिक्षण दिले. सावित्रीबार्इंनी ही आपल्या पतीच्या जीवन कार्याला मनापासून सहाय्य केले. 1848 मध्ये पहिली 1851 मध्ये दुसरी आणि 1852 मध्ये तिसरी मुलींची शाळा काढली. या शाळा व्यवस्थित चालू लागल्या. मेजर कँडी यांनी सरकारतर्फे 75 रुपये अनुदान मंजुर केले. फुले यांच्या या महान सामाजिक कार्याचा गौरव म्हणुन त्यांचा सत्कार ही करण्यात आला. या नंतर ज्योतिबांनी सामाजिक सुधारणेकडे विशेष लक्ष द्यायचे ठरविले. व्यक्ति स्वातंत्र्य, समता आणि बुध्दि प्रामाण्य यासाठी ते झगडू लागले. सतीची प्रथा, विधवा पूर्नविवाह, भृणहत्या (लहान मुलांची हत्या) या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला. केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेवून ”बालहत्या प्रतिबंधगृह” ही संस्था सुरु केली. समाजस्पृश्य-अस्पृश्य असा भेदाभेद पाळणाऱ्याचा रोष पत्करुन त्यांनी आपल्या घरी असलेला पाण्याच्या हौद सर्वांना म्हणजे अस्पृश्यांनाही खुला केला.

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे लक्षात येताच अस्पृश्यासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा उघडल्या, अनाथाश्रम काढले, वृत्तपत्र काढले. धर्म जन्माने न मिळता माणसाच्या स्वत:च्या बुध्दीने स्विकारला पाहिजे. शेतक­यांच्या व्यथा इंग्रज प्रशासनाच्या कानी पोहोचविल्या.शेतकरी हा समाजाचा कणा आहे. पोशिंदा अन्नदाता आहे, असे मत मांडले आणि जगजागृती केली. त्यांच्या साठाव्या वर्षी जनतेने मुंबईस त्यांचा नेत्रदिपक सत्कार करुन त्यांना ”महात्मा” ही पदवी बहाल केली. सामाजिक समता, आर्थिेकन्याय व शोषणमुक्ती यासाठी ज्योतिबाने अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या पुरोगामी विचारांना कृतीची जोड मिळाली जणू ती मानवतेच्या कणवतेची बैठक होती. ज्योतिबांच्या कृतीमुळे, कर्तृत्वामुळे या समाजाची नवी पहाट उदयास आली. सावित्रीमाई भारतातील आद्यकांतीकारी थोर स्त्री होती. ज्योतिबांना सावित्रीमाईची सक्रीय साथ लाभली. सामाजिक सुधारणेची सुरुवात आपल्या घरापासुन करणारे ज्योतिबाफुलें सारखे समाजसुधारक युगात होणे अशक्य आहे. सुधारकाग्रणी, संपूर्ण महाराष्टाचे भुषण, सुधारकांचे सुधारक त्यांच्या विचारांनी आणि धाडसी वृत्तीने कृत्तीने समाजाला जागे केले. काळाच्या खूप पुढे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. हीन-दीन-जीवांना एकोणिसाव्या शतकात त्यांनी आपल्या विशिष्ट ध्येयासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.

मानवी सामाजिक सुधारणेचे अवलेाकन केले, परिस्थितीचे अवलोकन केले आणि प्रकाशमय मानवी स्वातंत्र्याच्या दिव्य युगाकडे सामाजिक माणसाच्या नवयुगाची ग्वाही देणारा आधुनिक भारतातील पहिला समाजक्रांतीकारक क्रांतिबा ज्योतिराव फुले नावाचा धगधगता लाव्हा तयार झाला. कारण देशात जातीभेदाची सुनामी ऊफाळुन आली होती. त्यामुळे कोणी शुद्र नदीकाठावर वस्त्रधुत असता तेथे एखादा भट आला तर शुद्रास आपली सर्व वस्त्रे गोळा करुन भटाच्या अंगावर शिंतोडा येण्याचा संभव नाही, अशास्थळीजाऊन वस्त्रे धुवावी लागत. भटाच्या अंगावर नकळत पाण्याचा शिंतोडा उडालाच तर भटाने रागाने अग्नीसारखे तप्त होऊन आपल्या जवळचे जड भांडे शुद्रांच्या डोक्यावर मारावे, ब्राम्हणावर तर सावली सुध्दा पडू नये याची पूर्णपणे खबरदारी शुद्राने वस्तीतून वाट असेल त्या वाटेवरुन जाण्यास सुध्दा धोका पत्करु नये असा कायदा, अशा कायद्याचे राज्य होते, त्यामुळे राज्यात अनेक छळवाद होते. स्त्रियांना तर त्या रुढीने बंदीस्तच करुन ठेवले होते. पुरुषप्रधान व्यवस्थांच्या रणधुमाळी विषयी फुले म्हणतात की, स्त्री ही जात अबला असल्यामुळे तिच्यापूढे लोभी व धाडसी पुरुषांनी स्वत:चेच म्हणणे खरे केले आणि स्त्रीयांना मानवी हक्क समजू नयेत म्हणून पूर्ण अंधारात ठेवले. ज्योतिरावांना सावित्रीमार्इंची भक्कम साथ मिळाल्यानंतर त्यांनी विचार केला की, हे आता शुद्र अतिशुद्रांचा छळवाद बदलला पाहिजे. त्यावेळे पासून स्त्री चळवळीचा जन्म झाला.

महात्मा फुले आज जरी आमच्यात नाहीत परंतु कर्तृत्वाच्या रुपाने ते निश्चितच आमच्यांत आहेत. कारण जे दुस-यांसाठी मरतात, तेच ख­या अर्थानं जगतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाच्या रुपानं अमर असतात, म्हणजेच आपल्यातच असतात. आता हे जर खंर असेल तर महात्मा फुले देखील कार्यरुपानं आपल्यातच आहेत, असं नाही का तुम्हाला वाटत? मला तर वाटतं, या विषयाच्या निमित्तानं ज्ञानज्योतीचं चरित्र आणि चारित्र्याचा आचार, विचार आणि उच्चाराचा जवळून परिचय व्हावा आणि आपण त्यांचे कार्य जोमानं, जिद्दीनं आणि निष्ठेनं करावं असंच बहुधा बहुतेकांना अपेक्षित असावं लौकिकर्थानं आज जरी महात्मा फुले आपल्यात नसले, तरी त्यांचे अलौकिक कार्य कलेकलेनं वाढतच राहणार आहे.आणि त्यांचे अस्तित्व तर नेहमीचे आपल्यात राहणार आहे.  

ज्ञानज्योत प्रज्वलित केलेल्या ज्योतिबांना सामाजिक समता, मानवता, विवेक, विनय आणि नम्रता यावर प्रकाश टाकुन राष्ट्राला स्वायत्ततेच ध्येय गाठण्यासाठी गतिमान बनवायचं होतं. समाजजागरणाचा वसा घेतलेले स्त्रीशिक्षण आणि स्त्रीशक्ति जागृतीचा मंत्र निनादात ठेवणारे, आणि अस्पृश्यांबद्दल कणव आणि बंधुता बाळगणारे ज्योतिबा आज असते तर !  खरंच काय बरं वाटलं असतं त्यांना ? आजही समाजात समता आणि बंधुता पूर्णपणे उतरु शकली नाही हे पाहून ते नक्कीच अस्वस्थ झाले असते. जयंती आणि पुण्यतिथी या दोन दिवशी आपली आठवण ठेवणारे, याच दिवशी आपल्या पुतळयाला हार घालून खोटी पूजा करुन अवडंबर माजवणारे तथाकथित कार्यकर्ते आणि पुढारी पाहून त्यांना नक्कीच चीड आली असती.  

फुले आणि आंबेडकरांचे हे अतूट नाते ध्यानात घेतले की, दोघांच्याही वैचारिक त्याचप्रमाणे व्याव्हारिक जीवनावरही नवाच प्रकाश पडतो. दोघांचे चरित्र आणि कतृत्व शेजारी शेजारी ठेवले. तर दोन्ही समजायला नि:संशय मदत होते. 63 वर्षे चंदनासारखे झिजले. प्रवास केला, व्याख्याने दिली, लेख लिहिले. स्वातंत्र्य, समता, लोकशाही, विज्ञान, इहवाद या आधुनिक मुल्यांवर भर देऊन सामाजिक क्रांतीची प्रेरणा दिली. डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले. सहज सोप्या भाषेत नेमकी स्पष्टता आणणे त्यांना जमत असे. विचारांना कृतिशीलतेची जोड दिली. “जैसे बोलावे, तैसे चालावे, मग महंतलीला स्वभावे, अंगी बाणे” या समर्थवचनाची सार्थकता सिध्द करणारा हा महात्मा सर्व सुखाचे आगर नीतितत्त्वांचे माहेर अशा हया महात्म्याचे अविरत कष्टाने 28 नोव्हेंबर 1890 मध्ये अनंतात विलीन झाले, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!