पथविक्रेत्यांची उपासमार, पहिल्याच जागी व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी – गौरव अहिवळे

बारामती(प्रतिनिधी): येथील एम.आय.डी.सी. रस्त्यालगत व्यवसाय करून आपली व आपल्या कुटुंबियांची उपजिवीका भागविणारे पथविक्रेत्यांची सध्या उपासमारीचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच जागी व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव आहिवळे यांनी आज बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

एम.आय.डी.सी.रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांनी प्रशासनास सहकार्य करीत पहिल्या जागेवरून इतरत्र व्यवसाय करण्यास दिलेल्या जागेत व्यवसाय करण्यास सहमती दर्शविली. मात्र सद्यस्थितीला ज्या जागेत हे पथविक्रेते आपली व आपल्या कुटुंबियांची उपजिवीका भागविण्यासाठी व्यवसाय करीत आहेत त्याठिकाणी ग्राहकच येत नाही. यामुळे व्यवसाय होत नाही, व्यवसाय न झाल्याने गुंतविलेले भांडवल सुद्धा निघेनासे झालेले आहे. काही पथविक्रेत्यांनी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यास मेटाकुटीस आलेले आहेत. अशा चोहुबाजूने हा पथविक्रेता भरडला गेलेला आहे.

या पथविक्रेत्यांवर बानप अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करून हटवण्यात आले होते. त्यानंतर सदर पथविक्रेत्यांनी नगर परिषद समोर सात दिवस उपोषण केल्यावर तात्पुरती जागा पथविक्रेते यांना देण्यात आली होती. परंतु तात्पुरती जागेत ग्राहकच येत नसल्याने उपजिवीकेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

पथविक्रेते यांना पहिल्याच जागेवर व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर जागेचे भाडे/ कर देण्यास पथविक्रेते तयार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. पहिल्याच जागी व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देणार असल्याचे गौरव अहिवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भिगवण चौक ते पेन्सिल चौक रस्त्यालगत सुशोभिकरण करण्यात आले आहे. सुशोभिकरण केलेल्या जागी दुचाकी व चारचाकी वाहने लागली तर शहराचे विद्रुपीकरण होत नाही मात्र, पथविक्रेते बसले की शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर चालण्यासाठी ज्याप्रमाणे ते वर्षाचा वन टाईम टॅक्स भरतात तसेच वाहन 15 वर्षापेक्षा जास्त वयाचे झाल्यास त्याचा पर्यावरण कर सुद्धा भरतात त्याप्रमाणे या पथविक्रेत्यांना कर आकारल्यास तो कर भरण्यास हे पथविक्रेते तयार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!