मुंबई दि.26 मार्च : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
उबाठा गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.त्यामुळे आपल्या या पक्षाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. आज पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्नेहल जगताप आपल्या पक्षात आली आहे. माणिकराव जगताप यांचे आणि माझे फार जुने संबंध होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम स्नेहल जगताप करतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
पक्षाची ताकद कोकणात वाढत आहे आणि स्नेहल जगताप यांच्यामुळे अजून वाढणार आहे. राजकारणात कोण कुणाचा कायम शत्रू नसतो हे सांगतानाच कोकणाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम, मंदाताई म्हात्रे असे नेते घडवले याची आठवणही अजित पवार यांनी सांगितली.
कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. कोकणात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी माझा प्रयत्न असतो असेही अजित पवार म्हणाले.
शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करुया असे आवाहन अजित पवार यांनी केले.
नुसत्या भाषणांनी पक्ष वाढणार नाही त्या भाषणातून फक्त विचार घेता येतात. लोकांपर्यंत जाऊन काम करायला हवे असे सांगतानाच तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा शब्द अजित पवार यांनी आज प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना दिला.
महाड – पोलादपूर मतदारसंघातील उबाठा गटाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये महाड – पोलादपूर मतदारसंघातील उबाठा गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यासह रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत जगताप,श्रेयस जगताप,तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जिल्हा परिषदचे माजी सभापती नारायण डामसे,माजी सभापती जयवंतीताई हिंदूळा आदींसह कर्जत तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे,रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील,रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे,प्रदेश उपाध्यक्ष कप्तान मलिक, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, रायगड महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती उमाताई मुंडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.