मुंबई: आगामी काळात राष्ट्रवादीची नवी टीम तुम्हाला दिसेल, अनं आमच्या पक्षाचे चिन्ह कुठेही जाणार नाही असे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांनी सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, माझा राज्यातील कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर खूप विश्वास आहे. राजकीय पक्षांची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. नाव, चिन्हावर हक्क सांगतील, पक्षावर दावा त्यांनी सांगितला आहे. मात्र तुमच्यात येऊन बोलण्यासाठी तर कुणी मला अडवू शकत नाही ना? असा प्रश्न शरद पवारांनी विचारत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही. याची मला खात्री आहे. मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली तेव्हा चिन्ह होते बैलजोडी, त्यानंतर कॉंग्रेस फुटल्यावर आमची खूण होती चरखा, त्यानंतर गाय वासरु हे चिन्ह होते. चार खुणा माझ्याच आयुष्यात मी लढलो. लोक खूण वगैरे पाहात नाहीत काय काम करु शकतो उमेदवार ते पाहतात. जनतेवर माझा विश्वास आहे. मला लोकांनी 14 वेळा निवडून दिले आहे. त्याअर्थी माझ्यावर विश्वास असावा असेही पवार म्हणाले.
तुमच्या पक्षातला आश्वासक चेहरा कोण हे विचारण्यात आलं. ज्यावर हात उंचावून शरद पवार यांनी शरद पवार असे उत्तर दिले. या उत्तरानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.