मुंबई: बंडखोरीमध्ये ज्यांची नावं आहेत, त्यातील काही लोकांनी खा.शरदचंद्रजी पवार साहेबांशी संपर्क साधला आहे. त्यांनी सांगितले की, आम्हाला याठिकाणी निमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे. आमची भूमिका कायम आहे, याचा खुलासा सुद्धा आमदारांनी केला आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, पक्षाच्या काही सदस्यांनी विशेषत: विधीमंडळाच्या सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली आहे, याचं चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांच्या समोर येईल. त्यामुळे याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही.
बंडखोरीबाबतचे अधिक स्पष्ट चित्र माझ्या इतकेच जनतेच्या समोर मांडण्याची आवश्यकता आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) जर त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली तर त्याबद्दल माझा विश्वास बसेल. त्यांनी तशी भूमिका मांडली नाही, तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.