मुंबई: मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही अशी प्रतिक्रीया खा.शरदचंद्रजी पवार यांनी पत्रकारांसमोर दिली.
1980 मध्ये निवडणुकीच्या नंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्याचे 58 आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर सहा सोडले तर बाकी सगळे सोडून गेले होते. सगळे पक्ष सोडून गेले, मी विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी पाच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना बरोबर घेऊन मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी केली. त्यानंतर जी निवडणूक झाली की त्यात आमची संख्या 69 वर गेलेली दिसली. त्यावेळी जे पक्ष सोडून गेले त्यापैकी 4 जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. 1980ला जे चित्र दिसलं तेच जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हे मी पाहतो आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे असेही शरदचंद्रजी पवार म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस विषयी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. त्यांनी यावेळी राज्य सहकारी बँक, सिंचनासंदर्भात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. याबाबत पवार साहेब म्हणाले मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.
प्रश्न आता दुसरा आहे की आमचे काही सहकारी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. 6 जुलैला मी महाराष्ट्रातल्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले होते. संघटनात्मक बदल करण्याचे काही प्रश्न होते त्याचा विचार करणार होतो. पण त्यापूर्वीच काही सहकार्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत असं त्यांनी सांगितलं. माझं स्वच्छ मत असं आहे की पक्षाचे काही सदस्य, खासकरुन विधीमंडळाचे कितपत वेगळी भूमिका घेतली आहे याचं चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
ज्यांची नावे आली आहेत त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला निमंत्रित करुन सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे असंही पवार साहेबांनी म्हटलं आहे की, याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मला जे सांगत आहेत त्यांनी जनतेसमोर हे मांडलं तर मी ते मान्य करेन अन्यथा त्यांनीही वेगळी भूमिका घेतली असं मी समजेन.