बारामती(उमाका): भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नव मतदारांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.
201-बारामती विधानसभा मतदार संघाच्यावतीने बारामती शहरातील मोरोपंत नाट्यगृहात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षक यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. नावडकर बोलत होते. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, परिविक्षाधीन नायब तहसीलदार तुषार गुजवटे,मतदान केंद्रस्तरिय अधिकारी, पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.
श्री. नावडकर म्हणाले, सुदृढ लोकशाही आणि निवडणूक चांगल्या प्रकारे होण्याकरिता मतदार हा सर्वात महत्वाचा घटक आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत बीएलओनी प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करावी. त्याला आपल्या मतदान केंद्राची चांगली माहिती असावी. एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे एकत्रित असणे आवश्यक आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपल्या यादी भागातील सर्व मतदारांच्या घरोघरी भेट देऊन मतदार नोंदणी, मयत, स्थलांतरित, दुबार, मतदार वगळणी, अस्पष्ट फोटो दुरुस्ती, डीएसइ, पीएसइ व 80 वर्षावरील मतदारांची पडताळणी याप्रमाणे कामकाज करावयाचे असून 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर पर्यंत मतदार यादी नवीन नोंदणी, वागळणी, दुरुस्ती संबधीचे कामकाज वर नमूद कालावधी मध्ये पूर्ण करावयाचे आहे.
दिव्यांग मतदारांची नोंदणी ही करावयाची आहे. मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर कराव्यात. आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदारांकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे आदी कार्यवाही करण्यात यावी. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी भारत निवडणूक आयोगाकडून गरुडा प बंद करुन नवीन बीएलओ प उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या नवीन ऍपचा वापर कशा पद्धतीने करायाचा याबाबत सर्व पर्यवेक्षक व बीएलओ यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी जास्तीत जास्त नवीन नाव नोंदणी करण्यासाठी बारामती तालुक्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, औद्योगिक आस्थापना येथे विशेष शिबीरे आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच मतदार संघातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे आवाहन सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.