बारामती: अवैध वाळू उपसा करणार्यांचे चित्रीकरण करून विरोध केल्याप्रकरणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेचे बार्शी तालुकाध्यक्ष आकाश पांडूरंग दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्यावर कठोर कारवाई करणेबाबत संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष वस्ताद अस्लम शेख यांनी मुख्यमंत्र्यांसह विविध ठिकाणी मेलद्वारे निवेदन दिले आहे.
दळवी हे बार्शी तालुक्यातील खांडवी गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता सुद्धा आहेत. दि.16 जून 2023 रोजी मध्यरात्री 1 वा. खांडवी ते कव्हेकडे जाणार्या रस्त्यावर गोडसेवाडीजवळ दळवी यांच्या गावाजवळ ढोर ओढ्या पात्रातील अवैध वाळूचे उत्खनन सुरू होते. या बेकायदेशीर उत्खनन करण्यास विरोध केला असता अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात डोक्यास, पाठीमागे जोरास मार लागला असुन त्यांचे हात व पायाला फ्रॅक्चर झाल्याचे कळते.

सामाजिक काम करणार्यावर असा प्राणघातक हल्ले होणार असतील तर हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही असे अस्लम शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना मदतीचा हात आपण दिला तर त्यांचे आयुष्य सुकर होऊ शकते. केलेली मदत वर्तमानाबरोबर, भविष्यासाठीही उपयुक्त ठरत असते या विचारातून सामाजिक कार्य हेच कार्यक्षेत्र समजून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटना समाजात काम करीत आलेली आहे असेही ते म्हणाले.
दळवी यांनी सामाजिक कामातून शासनाचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक करणार्यांचे भांडे उघड करण्याचा प्रयत्न केला मात्र, आज दळवींवरच खंडणी मागितली असे गंभीर आरोप करून त्यांच्या स्वच्छ चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सामाजिक कार्य करणारे पुढे येत नाही अशा प्रकारे नाहक गुन्ह्यात गुंतविण्याचा प्रयत्न होत असेल तर यापुढे कोणताही सामाजिक कार्यकर्ता गुन्हे घडत असताना मुग गिळून गप्प बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे गृहखात्याने सुद्धा याबाबत विचार करावा असेही अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून संतांनी लोकांना जागृत करण्याचे कार्य केले. संत महात्म्यांनी जनसेवा ही ईश्र्वर सेवा आहे अशी शिकवण दिली. मानवतेची सेवा या भूमिकेतून मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटना रोगी-व्याधीग्रस्तांना औषधे, भूकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, निरक्षरांना शिक्षण, अपंगांना संरक्षण इ. कार्य करीत आलेली आहे. स्वयंसेवी कार्य ही मानवाच्या हृदयातून येणारी स्फूर्तीदायी घटना आहे. अशा प्रकारे काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होऊन त्याच्यावरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार असतील तर संपूर्ण राज्यात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेतर्फे लढा उभारला जाईल असाही इशारा अस्लम शेख यांनी दिला आहे.
गुन्हेगारांचा गुन्हा उघडकीस आणणारा सामाजिक कार्यकर्ता आणि त्याच सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हेगारांचे ऐकून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत असतील तर येणार्या काळात प्रशासनाला संघटना सहकार्य करणार तर नाही मात्र, या विरोधात मोठे आंदोलन उभे केल्याशिवाय राहणार नाही असेही अस्लम शेख यांनी बोलताना सांगितले.