बारामती(वार्ताहर): संत सोपान काका महाराज पालखी सोहळा कोर्हाळे बु।। (ता.बारामती) जवळील कठीण पुल येथील विसावा आटोपून मार्गस्थ होताच संत निरंकारी मंडळाच्या वतीने परिसरात स्वच्छता करण्यात आली.
कोर्हाळे येथील मुक्काम आटोपल्यानंतर संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचा कठीण पूल येथे पहिला विसावा असतो. या ठिकाणी थोपटेवाडी, सावंत वस्ती, बजरंगवाडी, लाटे, माळवाडी, कुरणेवाडी आदि परिसरातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. या परिसराला दोन तासांसाठी यात्रेचे स्वरूप येते.
पालखी मार्गस्थ झाल्यानंतर येथे पाण्याच्या बाटल्यासह अन्य कचरा मोठ्या प्रमाणात होतो. संत निरंकारी मंडळ बारामती व मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कठीण पूल येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
निरंकारी मंडळाच्या सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने मंडळाच्या सदस्यांनी त्यात सहभाग घेतला. याप्रसंगी पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजदीप राजगे, आरोग्य सहाय्यक झगडे, मोहन नवले, रोहन जाधव, नामदेव माळशिकारे आदींची उपस्थिती होती. सावंत वस्ती सत्संग मंडळातर्फे यावेळी वारकर्यांना आणि न्याहारीसाठी पिठलं-भाकरीची व्यवस्था करण्यात आली होती.