बारामती(वार्ताहर): देहू ते बारामती 3 हजार वारकर्यांना औषधांचे वाटप करण्यात आले असुन ही सेवा बारामतीपासून वाखरी (पंढरपुर)पर्यंत सुरु राहणार असल्याचे कै.रामचंद्र भिसे (गुरूजी) वैद्यकीय प्रतिष्ठाने अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.
गेली 23 वर्ष कै.रामचंद्र भिसे (गुरूजी) वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने जनसेवा हिच ईश्वरसेवा या उद्देशाने प्रेरीत देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आषाढी वारीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील वारकर्यांसाठी श्रीमती सोनियाजी राजीवजी गांधी फिरता मोफत दवाखाना ही सुविद्या उपलब्ध करुन देण्यात येत असते.
पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणार्या ज्ञानेश्वर सेवा समिती अकोला (विदर्भ) या संस्थेला औषधांची मदत केली आहे.
पालखी मार्गावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी या उपक्रमास भेट देवून करीत असलेल्या सेवेचे कौतुक केले.
या सेवा उपक्रमात डॉ.अप्पा आटोळे व डॉ.योगेश पाटील (लासुर्णे) तर राजेंद्र गायकवाड हे मदतनीस सहभागी आहेत असेही डॉ.विजय भिसे यांनी सांगितले.