बारामती(वार्ताहर): अभ्यास किंवा करिअर करताना इतरांशी तुलना करण्यापेक्षा आपली क्षमता, आवड विचारात घेत विद्यार्थ्यांनी करइर निवडायला हवे व त्यास पालकांनीही साथ द्यायला हवी असे प्रतिपादन करइर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी केले.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने दहावी बारावीचे विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन या विषयावर शनिवारी (ता. 17) करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी शिंदे यांचा सत्कार केला.
शिंदे म्हणाले, दहावी बारावीनंतर करिअर करताना पालकांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करण्यासह नेमक्या करिअरची दिशा देखील निश्चित करण्याची गरज आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश घेताना पालकांची आर्थिक क्षमताही विचारात घेऊनच तसा निर्णय घ्यावा. दहावीनंतर विज्ञान शाखेकडे जाण्याचा अट्टाहास करण्याअगोदर स्वताला नीट तपासून घ्यायला हवे. प्रॅक्टिकलवर विद्यार्थ्यांनी भर द्यायला हवा कारण त्या शिवाय संकल्पनाच समजत नाही. दहावीला किती गुण मिळाले हे विसरुन अकरावी व बारावीचा अभ्यास प्रत्येकाना करायला हवा.
विद्यार्थ्यांना दहावीत चांगले गुण मिळतात पण बारावीत ते मिळत नाहीत, करिअरच्या दृष्टीने बारावीचे गुण जास्त महत्वाचे ठरतात. दहावीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याने किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेची परिक्षा द्यायलाच हवी. राष्ट्रीय स्तरावरील ही परिक्षा अनेक संस्थांत प्रवेश घेताना उपयोगी ठरते व यातून शिष्यवृत्तीही मिळू शकते.
दरवर्षी प्रवेश प्रक्रियेत बदल होत राहतात, त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी ही प्रक्रीया अभ्यासणे गरजेचे असल्याचे हेमचंद्र शिंदे यांनी या वेळी नमूद केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले.