बारामतीकरांना अभिमान वाटेल असे स्थलांतरीत पक्ष्यांसाठी बारामती सुरक्षित जागा – अनुज खरे

बारामती(वार्ताहर): बारामतीकरांना अभिमान वाटेल असे स्थलांतरीत पक्ष्यांसाठी बारामती ही एक सुरक्षित जागा असल्याचे प्रतिपादन निसर्ग व पक्षी अभ्यासक अनुज खरे यांनी केले.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील नक्षत्र गार्डन येथे शनिवारी (ता. 3) निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री.खरे बोलत होते. फोरमच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार यांनी स्वागत केले.

याप्रसंगी निसर्गभ्रमंती का करायची याचे सहजसोप्या भाषेत श्री.खरे यांनी विवेचन केले. ते पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांना पेरते व्हा असा संदेश देणारा पावशा पक्षी, आयुश सुबक पक्षी, शिंपी (टेलरबर्ड), सातभाई, नाचरा, छोटा निखार, बुलबुल यासह अनेक पक्ष्यांची त्यांनी या भ्रमंतीदरम्यान माहिती दिली.

वेळेच्या बाबतीत व स्थलांतर करताना जिथून ते निघतात तेथे परत जाण्याच्या वेळा व ठिकाणे किती अचूक असतात याबाबत माहिती सविस्तर माहिती दिली. नेचर वॉक म्हणजे निसर्ग भ्रमंती केल्याने वेगळा आनंद तर मिळतोच पण त्या सोबत निसर्गात काय बदल होतात हे पक्ष्यांच्या माध्यमातून आपल्याला समजते.

बारामती परिसरातील गवताळ प्रदेशात जवळपास 268 प्रकारचे पक्षी नोंदवले गेलेले आहेत. बारामतीच्या नक्षत्र गार्डनमध्ये अतिदुर्मिळ प्रकारचे स्थलांतरीत पक्षी आढळतात, बारामतीत अनेक वर्षापासुन येथे पक्षी स्थलांतर करतात, जेथे पक्ष्यांना त्रास होतो तेथे पक्षी पुन्हा फिरकत नाही. देशी झाडांवर पक्षी घरटी करतात, त्यामुळे अशा झाडांना प्राधान्य द्यायला हवे असेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी हनुमंतराव पाटील यांनी विविध वनस्पतींबाबत उपस्थितांना माहिती दिली. डॉ.सलीम अली यांनी केलेल्या पक्षी अभ्यासाचे तसेच विविध वनस्पतींवर केलेल्या संशोधनांचेही त्यांनी दाखले दिले.

फोरमच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार यांनी निसर्गवाचन करण्याची आवड निर्माण व्हावी, बारामतीकरांना पक्ष्यांबाबत परिपूर्ण माहिती मिळावी या उद्देशाने निसर्गभ्रमंतीचे आयोजन केल्याचे नमूद केले. ग्लोबल वार्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाची काळजी घेणे गरजेचे असून निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पुढील काळातही फोरमच्या माध्यमातून वर्षभर असेच उपक्रम राबविले जाणार असून निसर्ग स्वयंसेवकांना प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बारामती पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आवर्जून या निसर्ग भ्रमंतीसाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!