बारामती(वार्ताहर): वरातीत नाचण्यावरून कारण नव्हे तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करू नको या खर्या कारणावरून जातीवादी गावगुंडांनी नांदेड शहराजवळील बोंढार हवेली येथील निष्पाप अक्षय भालेराव या युवकाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी बारामतीत सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने या घटनेचा निषेध करून उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, सुमित साबळे, गणेश भाईजी सोनावणे, विजय जगताप, दादा कांबळे, निखिल खरात, अभिलाष बनसोडे, नितीन थोरात, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील नेते मंडळींनी सह्या करून निवेदन देतेसमयी उपस्थित होते.
भारत लोकशाही देश म्हणून, राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात नागरिकांमध्ये भेदभाव करू नये. असे असताना सुद्धा आजही अशा घटनांना सामोरे जावे लागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे.
अक्षयच्या पोटात सपासप वार करण्यात आले. यावेळी दोन गटात दगडफेक सुद्धा झाली या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. अक्षयला रूग्णालयात हलवण्यात आले पण दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
स्वार्थी राजकारण्यांमुळे जातीवादाने पूर्वीपेक्षा अधिक घातक रूप धारण केले असून त्यामुळे सामाजिक कटुता वाढली आहे.
सदर आरोपींविरुद्ध हत्या आणि ऍट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अद्याप एक आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक श्री.पोरे करीत आहेत. या घटनेमध्ये तात्काळ न्याय नाही मिळाल्यास संबंध महाराष्ट्र मध्ये मोठे जन आंदोलन उभे राहील असा इशारा देखील दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ’जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या पुस्तकात म्हटले आहे की’ प्रत्येक समाजातील बौद्धिक वर्ग हा शासक वर्ग नसला तरी तो एक प्रभावी वर्ग आहे.’ केवळ बुद्धी असणे हा गुण नाही. आपण बुद्धीचा वापर कशासाठी करतो यावर बुद्धीचे गुण आणि अवगुण अवलंबून असतात आणि आपण बुद्धीचा कसा वापर करतो हे आपल्या जीवनाच्या उद्देशावर अवलंबून असते. येथील पारंपारिक बुद्धिजीवी वर्गाने आपली बुद्धिमत्ता समाजाच्या हितासाठी वापरण्याऐवजी समाजाच्या शोषणासाठी वापरली आहे.