राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार हे एक प्रमुख भारतीय राजकारणी म्हणून सर्वत्र गणले जातात. राजकारणातील कुशाग्र बुद्धीचे नेते म्हणून त्यांचे कौतुकही होते. कृषी आणि ग्रामीण भागातील विकास कामांमधील त्यांच्या कौशल्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. भारतात शेतकर्यांचे वकील म्हणून त्यांनी सक्षमपणे काम केले आहे. देशाची आर्थिक धोरणात त्यांचा मोलाचा वाटा आहे प्रामुख्याने व्यापार, उद्योग क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे. पाच दशकांपेक्षा जास्त काळ देशाच्या राजकारणामध्ये सक्रीय असणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वापैकी ज्येष्ठ एक पवार साहेब आहेत.
एवढं सर्व पवार साहेबांबाबत देशातील प्रत्येक नागरीक बोलत असताना, त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत का? असा प्रश्र्न पडलेला आहे. आज कोणीही उठसूट पवार साहेबांच्याबद्दल उलट-सुलट बोलत आहेत. ज्यांना स्वत:चा शेंबुड पुसता येत नाही ती राजकारणात आलेली मुलं पवार साहेबांना कशाचीही उपमा देवून बेइज्जत करीत आहेत. मात्र, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या व पक्षाच्या नेते मंडळींवर स्वत:ची दुकानदारी चालवून, गडगंज पैसा कमवून ढेकर सुद्धा न देणारी मंडळी मुग गिळून गप्प का?
पवार साहेबांच्या नावावर कित्येकांनी आपआपली दुकानदारी तेजीत चालविली आज त्याच पवार साहेबांवर कोणीही काही बोलत आहेत त्यावर साधा निषेध सुद्धा व्यक्त होत नसेल तर ही खूप खेदाची बाब आहे. पक्षातील पदाधिकारी पक्षाच्या नावावर आर्थिक गडगंज झालेले आहेत त्यांनी सुद्धा पक्षाची बैठक घेऊन निषेध केला नाही. विशेषत: बारामतीत पक्षाच्या व पक्षाच्या नेत्यांच्या जीवावर खुप मोठी झालेली मंडळी दिसतात. ही मंडळी कधीही रस्त्यावर येऊन निषेध, आंदोलन करीत नाही. निषेध, आंदोलन करण्याचा ठेका फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीच उचलला आहे का? हा सुद्धा प्रश्र्न आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना पडलेला आहे.
बारामतीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी परिस्थिती पाहिली असता, आजही तोच झेंडा घेऊन तेच कार्यकर्ते पुढे असतात, त्या कार्यकर्त्याच्या घरात एकवेळ खायला नाही मात्र, पक्षाचा झेंडा, पक्षाच्या नेत्यासाठी जीव देण्याची तयारी दर्शवितात. याच कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या वेळी पक्षातील पदाधिकारी तोंड फिरवतात तर नेते मंडळी पुन्हा ढुंकून सुद्धा त्याच्याकडे पाहत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
चांगल्या कुटुंबातील उच्चभ्रु वस्तीतील मुलांना मोठ-मोठ्या कंपन्यांचे ठेके, शोरूम, कंपन्या, महत्वाची पदे दिले जातात. यावर ही मंडळी गडगंज होतात आणि पक्ष व नेत्यांकडे पाठ फिरवतात. पक्षाच्या घडामोडीत सुख-दु:खात सहभागी होत नाही. तळागाळातील कार्यकर्ता मात्र, एकनिष्ठेने तो पक्षाचे काम करीत असतो, त्याला पक्ष आणि आपला नेता मोठा झालेला आवडतो. मात्र, नेत्यांना आपला सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झालेला कधी आवडेल या प्रतिक्षेत निष्ठावंत कार्यकर्ते आजही पक्षात थांबलेले आहेत.
मध्यंतरी असाच एक पवार साहेबांबाबत गैरप्रकार घडला होता. एका निष्ठावंत कार्यकर्त्याने युवकांना जमवून बारामतीत निषेध व्यक्त केला. त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष किंवा पक्षाच्या नावाखाली गडगंज झालेल्या कोणत्याही कार्यकर्ता व पदाधिकार्याने निषेध नोंदवला नाही. आज याच निषेध करणार्या कार्यकर्त्याच्या कुटुंबावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असणार्या संस्थेने किरकोळ वादातून गुन्हा दाखल केला. या कृतीतून कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यायचा हा खरा प्रश्र्न आहे.
पवार साहेब, दादा व ताईंवर एकनिष्ठेने काम करणारे भरपूर आहेत. मात्र, हे नेते मंडळी आलेनंतर त्यांच्या पुढे लाळघोटे पणा करणारी मंडळी बोटावर मोजणारी आहेत. या मंडळीमधून नेत्यांना एकनिष्ठेने काम व प्रेम करणार्यांकडे कधी लक्ष जाईल का? असाही प्रश्र्न पडलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये शहर व तालुक्यात गटबाजीचा डोंगर निर्माण झालेला आहे. ज्या-त्या गटाच्या जवळ असणार्याची संचालक, सदस्य पदावर वर्णी लागत आहे. या गटबाजीमुळे निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाच्या दूरच्या कोपर्यात गेला आहे. नेते मंडळी याचा शोध घेवून या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुढे आणतील का? त्याची आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती सुजलाम, सुफलाम बनवतील का? नाहीतर लाळघोटे करणार्यांचे ऐकून निष्ठावंत कार्यकर्ता व त्याच्या कुटुंबावर कोणतीही शाहनिशा न करता खोटे स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत राहतील.