युवकांना रोजगार व सावकार, दलालांपासून मुक्तता मिळणेसाठी अस्लम शेख यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

बारामती(वार्ताहर): बारामतीमध्ये युवक रोजगारापासून वंचित असुन धनदांडग्या सावकार, दलालांपासून नागरीकांना मुक्तता मिळणेसाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे बारामती तालुका अध्यक्ष अस्लम शेख यांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.

शेख यांनी निवेदनात म्हणाले की, बारामतीचा चोहोबाजुने सर्वांगिण विकास होत आहे. बारामतीचा विकासाची चर्चा दिल्लीपासुन गल्लीपर्यंत होत आहे याबाबत बारामतीच्या प्रत्येक नागरीकाची मान उंच होणार यात तिळमात्र शंका नाही. जसा विकास झाला त्याच कित्येक पटीने जमिनींना सोन्याचे भाव आले. गुंठेवारी वाढीस लागलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या खिश्यात मुबलक पैसा खेळत आहे. यामुळे शेती व शेतीला असणार्‍या जोडधंद्याकडे दुर्लक्ष होत आहे.

आपण म्हणतो पुणे तिथे काय उणे तीच म्हण बारामती तिथं काय उणं अशी प्रचलित होत आहे. आसपासच्या तालुका व जिल्ह्यातील नागरीक रोजगार, हाताला काम मिळेल या उद्देशाने बारामतीत स्थायिक होण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढं असताना बारामतीतील सुशिक्षीत युवक वर्गाला हाताला काम नाही. काम आहे तर त्याठिकाणी वशिला, ओळख द्यावी लागत आहे. उच्च शिक्षण झालेले असुन सुद्धा रोजगारापासुन वंचित रहावे लागत आहे. उत्तर प्रदेश, बिहार याठिकाणाहून आलेले बिगारीपासुन ते उच्चशिक्षीत युवकांना कमी पगारावर कामावर ठेवले जात आहे. या लोकांच्या ठिकाणी बारमाही दुष्काळ असल्याने पैसा बघायला मिळत नाही त्यामुळे ते रोजगाराच्या शोधात फिरत असतात, मग पगार किती मिळतो याकडे न पाहता पैसा हातात किती येतो हे पाहत असतात. यामुळे महाराष्ट्रातील युवकांना रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. हाताला काम नसल्याने युवकांच्या डोक्यात तात्काळ श्रीमंत होण्याची दिवास्वप्न पाहत असल्याने चोरी, दरोडा, खून, भ्रष्टाचार इ. सारख्या गंभीर गुन्ह्याकडे वळत आहेत.

महागाई वर डोकं काढू देत नाही त्यामुळे हातावरचे पोट असणारे टपरीवाले, फुलवाले इ. जीवन व्यथित करणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. ज्या हद्दीत गाडा, टपरी लावली त्याठिकाणी अतिक्रमण कारवाई होत असते यामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. रोजगाराची समस्या, त्यात येणारी मंदी यामुळे नकळत खाजगी सावकार, बँका, पतसंस्था इ. ठिकाणी तो युवक वळला जातो आणि कर्जाचा डोंगर डोईवर घेऊन कर्ज फेडावे कसे आणि धंदा करावा कसा याबाबतचे गणित आजही उलघडले नाही. यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावे असेही त्यांनी म्हटले आहे.

बारामतीत वाढते अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरीकांची पिळवणूक, अडवणूक व फसवणूक होत आहे. यामुळे विकासात्मक बारामतीत उपासमारीचे दिवस व्यथित करावे लागत असेल तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आझादी मिळून सुद्धा सांगितले होते, ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है। त्याचप्रमाणे बारामतीचा विकास जरी झाला तरी आजचा युवक वर्ग रोजगारापासुन उपाशी आहे. वेळ पडल्यास त्याला राहते घर विकावे लागत आहे किंवा खाजगी सावकार त्या घरावर नजर ठेवून आहे.

तरी मुख्यमंत्री साहेबांनी या सर्व बाबींचा विचार करून सर्वसामान्य नागरीकांच्या हाताला काम, रोजगार उपलब्ध करून द्यावा. अवैध धंदे, खासगी सावकार, बँका, फायनान्स्‌, पतसंस्थेच्या अनाठायी व्याजापासुन मुक्त करावे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यक निधी योजना सुरू आहे त्याचप्रमाणे युवकांना रोजगारासाठी कमी व्याजदरात थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून कर्ज उपलब्ध द्यावेत यामुळे सध्याचा युवक बलशाली भारत करण्यामध्ये आणखीन पुढाकार घेईल अन्यथा युवकाचाच कणा मोडला तर बलशाली भारत सोडा महाराष्ट्राला काठीचा आधार घ्यावा लागेल असेही अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

अस्लम शेख यांची मनापासून सतत तळमळ असते की, युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. युवक व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. अवैध धंदे, सावकारापासुन मुक्ती मिळाली पाहिजे. कर्जातून मुक्त झाला पाहिजे. याच स्वच्छ उद्देशाने त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!